नाशिक : पुढारी वृत्तसेवा – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्कालिन कक्ष स्थापन करण्यात आला असून, २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना व आपत्ती व्यवस्थापन कक्ष विभागीय महसूल कार्यालय व पुढे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संलग्न करण्यात आला आहे. या कक्षासाठी २४ तास कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. ३१ मे पर्यंत शहरातील रस्त्यांची खोदाची कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून रस्ते दुरूस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकेदायक घरे, वाडे कोसळून जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने धोकादायक वाडे, घरांचा भाग उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाणीपुरवठा टाळणे, काझी गढी मिळकत धारकांना नोटिसा बजावणे, रुग्णवाहिका शववाहिका तयार ठेवणे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा, विलंब किंवा टाळाटाळ केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. – स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
हेही वाचा: