वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथील पुणे-नगर महामार्गासह परिसरात धोकादायक होर्डिंगबाबत दै. 'पुढारी'ने 'खाली विजेच्या तारा अन् वर होर्डिंग!' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने आव्हाळवाडी फाट्यावरील धोकादायक होर्डिंगसह सात होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने काढले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन 'अॅक्शन मोड'वर आले असून, उपायुक्त किशोर शिंदे व नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील धोकादायक होर्डिंगवर गुरुवारी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. आव्हाळवाडी फाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक होर्डिंगसह अन्य ठिकाणचे सात होर्डिंग आकाशचिन्ह विभागाचे मुख्य निरीक्षक गणेश भारती यांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने काढून जमीनदोस्त केले आहेत.
होर्डिंगवर कारवाई चालू असतानाच वाघोली येथील एका स्थानिकाने वाघोली-केसनंद या राज्यमार्गावरील ईपिक सोसायटीजवळ वर्दळीच्या ठिकाणी असलेले धोकादायक होर्डिंग काढण्यात यावे, अशी लेखी तक्रार दिली. त्यामुळे या होर्डिंगवरसुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. वाघोली, पुणे-नगर महामार्गासह परिसरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे गणेश भारती यांनी सांगितले.
हेही वाचा