World No-Tobacco Day | शाळकरी मुलांवरही तंबाखू व्यसनाचा वाढता विळखा

World No-Tobacco Day | शाळकरी मुलांवरही तंबाखू व्यसनाचा वाढता विळखा

[author title="नाशिक : नील कुलकर्णी" image="http://"][/author]
१३ ते १५ वयोगटातील शाळकरी मुलांवर तंबाखू. तंबाखूजन्य उत्पादने यांच्या व्यसनाचा विळखा पडत असल्याचे धक्कादायक वास्तव नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध आकर्षक पॅकिंग आणि कमी निकोटीन असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थाच्या रुपातील उत्पादनांमधूनही अशा प्रकारची विक्री होत असल्याचे चित्र आहे.

'मुलांचे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून संरक्षण करणे' ही यंदाच्या तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना आहे. कारण शालेय विद्यार्थ्यांची तंबाखू सेवनाची आकडीवारी बघता त्यावर अंकुश ठेवण्यासाठी यंदा या संकल्पनेचा विचार केला जात आहे.

भारत सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार १०-१४ वयोगटातील सुमारे २० दशलक्ष मुले तंबाखूचे व्यसनी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या आकडेवारीत दररोज सुमारे ५५०० नवीन व्यसन करणाऱ्या मुलांची भर पडत आहे. दरवर्षी दोन दशलक्ष नवीन तंबाखूव्यसनींची त्यात भर पडत आहे. भारताच्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण-२०१९ मध्ये नुसार १३ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनाचे प्रमाण ८.४ टक्के आहे. गंभीर बाब म्हणजे वयाचा सातवा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच ११.४ टक्के मुले धुम्रपान करतात तर १७.२ टक्के मुले बिडी ओढण्यास सुरुवात करतात. २४ टक्के मुले गुटखा, खैनी, जर्दा व तत्सम पदार्थ यांसारखे धूरविरहित तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर करतात.

  • आज जागतिक तंबाखु विरोध दिन
  • तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण' यंदाची संकल्पना
  • १०-१४ वयोगटातील सुमारे २० दशलक्ष मुले तंबाखूचे व्यसनी
  • तंबाखूसेवन केल्यामुळे देशात दररोज होतात ३६०० मृत्यू
  • तंबाखू- तंबाखूजन्य पदार्थाने होतात २० पेक्षा जास्त कर्कराेग

कर्करोगासह इतर आजारांसाठी कारणीभूत ठरणारा तंबाखू उद्योग तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांची कमी हानीकारक नवीन उत्पादने बाजारात आणून त्यांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. आकर्षक पॅकेजिंगमध्ये गॅझेट किंवा खेळणीमध्ये अशा पदार्थांचे अंश आढळले असल्याची माहिती आहे. ही उत्पादने फळे आणि कँडी फ्लेवर्समध्ये विकली जातात आणि सोशल मीडिया मंचावरुन ती भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जातात.

१९८७ मध्ये तंबाखुमुळे होणारे आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू याकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचओ) च्या सदस्य देशांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनाची स्थापना केली.

तंबाखू वापरात जगात दुसरा क्रमांक…

धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात १० लाख मृत्यू धूम्रपानामुळे होतात. २ लाखांपेक्षा जास्त मृत्यू धूम्रपान व ३ लाख ५० हजार पेक्षा जास्त धूररहित तंबाखूच्या वापरामुळे होतात. कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे २७ टक्के रुग्ण तंबाखू सेवन करणारे असतात. तंबाखूचा वापरामुळे होणाऱ्या रुग्णांवरील खर्च व त्यांच्या मृत्यूमुळे होणारे एकूण वार्षिक आर्थिक नुकसान १ लाख ७७ हजार ३४१ कोटी रुपये असून ते भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास १.०४ टक्के एवढे आहे.

तक्रारींसाठी ऑनलान पोर्टल

भारतात तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी ई-सिगारेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीमवर प्रतिबंध आणण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. 'डब्ल्यूएचओ' ने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला ई-सिगारेटच्या विक्री आणि जाहिरातींशी संबंधित उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिकमध्ये २० ते २५ टक्के मुले 'ई सिगार'चे व्यसनी

तंबाखूजन्य पदार्थाचेच मुले सेवन करतात, असे नाही तर सिगरेटसह हुक्का पार्लर आणि ई सिगरेट ही हल्लीच्या तरुणाईसाठी 'स्टेटस सिंम्बॉल' प्रतिष्ठेचे लक्षणे होऊ पाहत आहे. मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही या व्यसनांपासून दूर करणे मोठे आव्हान ठरत आहे. गेल्या वर्षी 'वर्ल्ड यूथ टोबॅको फोरम' ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात १५ ते १८ वयोगटातील मुले आणि मुली ई सिगरेटचे व्यसनाधीन असल्याचा अहवाल प्रकाशित झाला. नाशिकमध्येही याच वयोगटातील सुमारे २० ते २५ टक्के मुले आणि मुलीही ईसिगरेटसह तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करत असल्याचे आम्ही घेत असलेल्या उपक्रमातून समोर आले आहे. – राज नगरकर, कर्करोग तज्ज्ञ, नाशिक.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news