Nashik News | चांदवडला बालविवाहप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

Nashik News | चांदवडला बालविवाहप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कुंदलगाव येथे अल्पवयीन म्हणजे 14 वर्षीय मुलीचा विवाह प्रौढ व्यक्तीसमवेत लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बालविवाहप्रकरणी पोलिस हवालदार बाळू सांगळे यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पाच व्यक्तींविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुंदलगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह हरिश्चंद्र दत्तू बिडगर यांच्याशी लावून देण्यात आला. बालविवाह करून देणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असूनदेखील अल्पवयीन मुलीचे वडील बळीराम बालाजी तिरवड (रा. सोनखेड, ता. लोहा, नांदेड), रामेश्वर नामदेव हरण (मामा), रुक्मिणी रामेश्वर हरण (आत्या, दोघे रा. जयपूरवाडी खंडाळा, हिंगोली, ह. मु. कुंदलगाव), हरिश्चंद्र दत्तू बिडगर (नवरा) व रंजना दत्तू बिडगर (सासू) यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक पवार अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button