धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तिघांचा मदत कार्य करताना बुडून मृत्यू | पुढारी

धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तिघांचा मदत कार्य करताना बुडून मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा – प्रवरा नदीपात्रामध्ये बुडालेल्या मुलांचा शोध घेत असताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन जवानांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीच्या पात्रात मुले बुडाली होती. या मुलांच्या शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी बुधवार (दि.२२) रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या वतीने धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार धुळे येथील टीम क्रमांक दोन मधील दोन अधिकारी आणि २३ कर्मचारी बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले. ही टीम आज घटनास्थळी पोहोचली. त्यांनी सकाळी शोध व बचाव कार्य सुरू केले. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकली. त्यामुळे बोट उलटली. या बोटीतील तिघे जवान पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाले. पण या घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ व पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा हे कर्मचारी बुडाले. त्यांना तातडीने बाहेर काढून हरिश्चंद्र बावनकुळे रुग्णालय येथे दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेत मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे तसेच पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ (रा. पांढरद, पोस्ट पिचडे, ता. भडगाव, जि. जळगाव) आणि राहुल गोपीचंद पावरा अशी मयतांची नावे आहे. यापैकी प्रकाश शिंदे हे २० एप्रिल २००५ रोजी सेवेत रुजू झाले होते. त्यांचा मूळ घटक दौंड येथील गट क्रमांक पाच असून ते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कोठडी येथील राहणारे आहेत. सध्या ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कॉर्टरमध्ये राहत होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुली असं परिवार आहे. तर वैभव सुनील वाघ हे एक सप्टेंबर २०१४ रोजी सेवेत रुजू झाले होते .त्यांचा मूळ घटक मुंबई येथील गट क्रमांक पाच असून ते पांढरद येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे .तसेच पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा हे एक ऑगस्ट 2014 रोजी सेवेत रुजू झाले होते. ते धुळे येथील गट क्रमांक सहा येथील मूळ घटकातील असून ते धुळे येथीलच रहिवासी आहेत. धुळे येथील शंभर कॉर्टर्स मध्ये ते राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील ,पत्नी असा परिवार आहे. या सर्व शहीद जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या परिसरात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या मृतदेह त्यांच्या परिवाराला सोपवण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button