नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या आज सभा

नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या आज सभा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत बुधवारी (दि.१५) 'प्रचार वॉर' रंगणार आहे. नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. तर, दिंडोरीतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चार सभा होत आहेत. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या बड्या नेत्यांच्या सभांमधून कलगीतुरा रंगणार आहे.

नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी मतदान होत आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात असून प्रचारसभा, रॅलींच्या माध्यमातून वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींची १ वाजता सभा होत असून, या सभेची महायुतीकडून जय्यत तयारी केली जात आहे. तब्बल दोन लाख लोक या सभेला उपस्थित राहतील, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता सभास्थळी मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. सभेकरिता कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन हजार पोलिस सभा परिसरात तैनात असणार आहेत. याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वणी, लासलगावमध्ये सभा होत आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांचीही येवल्यात सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार असून, या सभेसाठी महाविकास आघाडीने सर्व शक्ती पणाला लावली आहे. या तीनही बड्या नेत्यांच्या सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी महायुती, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांकरिता महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. सभास्थळी लोकांना आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या नेत्याच्या सभेला अधिकाधिक गर्दी खेचण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक मंत्री मोदींच्या सभेसाठी नाशिकमध्ये मंगळवारपासूनच ठाण मांडून आहेत. या सभांमुळे मात्र सुरक्षाव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news