Home Voting : धुळे लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदार बजावताय घरुन मतदानाचा हक्क | पुढारी

Home Voting : धुळे लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदार बजावताय घरुन मतदानाचा हक्क

धुळे : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना टपाली मतदान पद्धतीनुसार पथकांच्या माध्यमातून घरून मतदान नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार धुळ्यात शुक्रवार (दि.१०) पासून ‘होम वोटींग’ मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या पथकांच्या नियंत्रणाखाली ही मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज शुक्रवार (दि.१०) पासून 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकांच्यामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार घरून मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदार संघात 432 मतदार घरुन मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघ निवडणूकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्यामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघात तीनशे साठ 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर 72 दिव्यांग मतदार घरुन मतदानाचा हक्क बजावत आहे. याकरीता आज 10 मे पासून गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता संपूर्ण मतदार संघात 38 टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये तीन ते चार जणांचा समावेश असून ही टीम या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहेत. मतदानाची ही प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी प्रत्येक टीमला मतदार निहाय नियोजन ठरवून देण्यात आले आहे. आज शुक्रवार (दि.१०) सकाळी आठ वाजेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने धुळे लोकसभा मतदारसंघातील घरून मतदान करण्याचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील कुतूहल दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button