नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अवघी नाशिकनगरी सज्ज झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपरिक मार्गावरून मंगळवारी (दि. २३) सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच गाभारा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलेला आहे. पंचवटीमधील पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यामध्ये श्रींच्या मूर्तीला महाभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सामूहिक मारुती स्त्राेत्र पठण केले जाणार आहे. आगारटाकळी येथील गोमय हनुमान मंदिरातही भजन-कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय इतरही हनुमान मंदिरांमध्ये जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
अंजनेरी येथे महाआरती
रामभक्त हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे जन्मोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अंजनेरी जन्मस्थान संस्थेकडून यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. पहाटेच्या वेळी साधू-महंतांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला महाभिषेक करण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी साधू-महंत व भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालिसाचे पठण व महाआरती झाल्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंजनेरी ग्रामस्थांतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून, भाविकांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा: