नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे.
उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट जनजीवनावर होत आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशी बिरुदावली असलेले नाशिक आता उष्णतेच्या बाबतीत धुळे, जळगावच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून उन्हाचा पारा चाळिशी पार स्थिरावल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत आहे.
शहरात गुरुवारी किमान तापमानाचा पारा २३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. त्याचवेळी कमाल तापमानाचा पारा अद्यापही चाळिशी पार आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता नाहीशी होऊन सकाळी दहापासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. वाढत्या उष्णतेसोबत हवेतील गारवा नाहीसा झाल्याने सामान्यांना घरात बसणे मुश्कील झाले. दुपारी १२ ते ४ यावेळेत उन्हाचा प्रकोप अधिक असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. सायंकाळी साडेसहानंतर हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याने नाशिककरांना काहीसा मोकळा श्वास घेतला. दरम्यान, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मालेगाव, निफाड तापले
मालेगावमध्ये पारा ४१ अंशांवर होता. तर निफाडलाही उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उकाड्याने दोन्ही तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागातही उष्णतेचा कहर सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पारा ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे ग्रामीण जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या उकाड्यासोबतच पाण्याचे दुर्भीक्ष अधिक गडद होत आहे.
नाशिकचे तापमान
किमान : २३.५ अंश
कमाल : ४०.७
हेही वाचा: