जळगाव : केमिकल कंपनीला भीषण आग, २० पेक्षा जास्त कामगार जखमी तर पाच जण गंभीर | पुढारी

जळगाव : केमिकल कंपनीला भीषण आग, २० पेक्षा जास्त कामगार जखमी तर पाच जण गंभीर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला बुधवार (दि.१७) रोजी सकाळी ९ वाजता भीषण आग लागली. या आगीत २० हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेले आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज १७ रोजी सकाळी ९ वाजता केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे ३ ते ४ अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले.

केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याने धुराचे लाेट निघत होते

यावेळी कंपनीच्या लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ बाहेर पडताना दिसत होते. याआगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणारे २० हुन अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत हेमंत गोविंदा भंगाळे (वय- २७, प्रभात कॉलनी), मयूर राजू खैरनार (वय-२७, रा.जुना खेडी रोड), विशाल रवींद्र बारी (वय -२८,रा. श्रीकृष्ण नगर जुने जळगाव), सचिन श्रावण चौधरी (वय-२४, रा.रामेश्वर कॉलनी), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण ता.एरंडोल ह. मु. आयोध्या नगर), भिकन पुंडलिक खैरनार (वय-४२, रा. इच्छा देवी परिसर), चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय-२४, रा. धुळे ह.मु. रामेश्वर कॉलनी, जगजीवन) अनंत परब (वय-५३, रा.आयोध्या नगर), रमेश अजमल पवार (वय-२१, रा. रामेश्वर कॉलनी), नवाज समीर तडवी (वय -५१, रा.अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी), दीपक वामन सुवा (वय -२५, रा.विठोबा नगर, कालिका माता नगर), नंदू छगन पवार (वय-३५, रा. रामेश्वर कॉलनी), कपिल राजेंद्र पाटील (वय-२४, रा. आव्हाने ता. जळगाव) ,आनंद छगन जगदेव (वय-३८ रा. रामेश्वर कॉलनी), गणेश रघुनाथ सोनवणे (वय-५०, रा. सुप्रीम कॉलनी), फिरोज रज्जाक तडवी (वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी), किशोर दत्तात्रय चौधरी (वय-५० रा. रामेश्वर कॉलनी) चंद्रकांत दशरथ घोडे रावत (वय-४७ रा रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे जखमी झाले आहेत.

केमिकल कंपनीला आग pudhari.news
डब्ल्यू सेक्टर मधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीला आग लागल्यावर येथील परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली

घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यातील चार ते पाच कामगारांची प्रकृती गंभीर आहे. अजून जखमी कामगारांचा आकडा वाढविण्याची शक्यता आहे. यावेळी एमआयडीसीतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारांची आणि मित्र नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी  होत आहे.

हेही वाचा:

Back to top button