Ram Navami: सैनिक टाकळीत भाविकांच्या मांदियाळीत रामनवमी उत्साहात | पुढारी

Ram Navami: सैनिक टाकळीत भाविकांच्या मांदियाळीत रामनवमी उत्साहात

सैनिक टाकळी, पुढारी वृत्तसेवा : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे रामेश्वर मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामजन्मकाळ उत्सव साजरा झाला. Ram Navami

गावातील सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने सकाळपासूनच भजन, ग्रंथ वाचन सुरू होते. यानंतर कीर्तनकारांचे कीर्तन श्रीराम नामाचा जयघोष करीत पुष्पृष्टी करून आरती करण्यात आली. नंतर महिलांच्या कडून नामकरण सोहळा आणि श्रीरामाच्या पाळण्याचे गायन करण्यात आले. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर ट्रस्ट कडून नेटक नियोजन करण्यात आले होते. Ram Navami

वनवास काळात प्रभू रामचंद्र, माता सीता, आणि बंधू लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि माता सीतेने वाळू पासून स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवलेल्या श्री रामेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. दिवसभर रामेश्वर मंदिरात भाविकांची वर्दळ सुरू राहिली. गुढीपाडव्यापासून दररोज मंदिरात काकडा, रामायण वाचन, भजन प्रवचन, किर्तन आणि भोजन अशा भक्ती पूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम जन्म सोहळ्यानंतर टाकळी परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

हेही वाचा 

Back to top button