नाशिक लोकसभा 2024 | खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातून | पुढारी

नाशिक लोकसभा 2024 | खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा दिल्लीला जाण्याचा प्रवास मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेतूनच झालेला आहे. त्यामध्ये विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हरिश्चंद्र चव्हाण, गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले नरहरी झिरवाळ, धनराज महाले यांचा समावेश होतो.

जि.प.मध्ये ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वांशीच संपर्क येत असतो. तसेच दिंडोरी लोकसभेसाठी असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांचा आवाका जिल्ह्याचा प्रमुख ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये जि.प.मध्ये विविध गटांमधून निवडून येत सर्वांशी जनसंपर्क वाढवला जातो. त्याचा फायदा कोणत्या तालुक्यात कोणते प्रश्न आहेत? तेथील विकासकामांना किती वाव आहे. तसेच यामध्ये केंद्रस्तरावरून एखादा प्रकल्प आणता येईल का अशी चाचपणीही जिल्हा परिषदेतून होत असते. त्याबरोबरच तालुकास्तरावरील शासकीय कामकाज चालवणारी पंचायत समितीमधील सदस्यांची मोटबांधणी असो किंवा ग्रामपंचायत, बाजार समित्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसाठी जागा तयार करणे असो या गोष्टी जिल्हा परिषद सदस्य स्थानिक ठिकाणी करत असतात. त्याचा फायदा लोकसभा विधानसभा यांसारख्या निवडणुकांसाठी होत असतो.

जि.प.मध्ये असलेल्या सदस्यांमध्ये अनेक पक्षांचे सदस्य एकत्र येत असतात. त्यामुळे सर्वांसोबत पक्षविरहीत मैत्रीचे संबंध तयार होत असतात. या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विभागांचे सभापती यांचा समावेश असल्याने याठिकाणी याही शासकीय बाबींचा अनुभव या सदस्यांना मि‌ळतो. त्याचा फायदा भावी राजकीय कारकिर्दीला मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

पवार, भगरे जि.प. सदस्य
यंदाही दिंडोरीमध्ये समोरासमोर उभे ठाकलेले डॉ. भारती पवार आणि भास्कर भगरे हे दोघेही जिल्हा परिषदेचे एकेकाळी सदस्य राहिलेले आहे. त्यामुळे यांपैकी कोणीही खासदार झाले, तरी दिल्ली व्हाया मिनी मंत्रालय हा प्रवास सुरूच राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button