Lok Sabha Election 2024 | भाजप सर्वेक्षणात छगन भुजबळच ‘बाहुबली’ | पुढारी

Lok Sabha Election 2024 | भाजप सर्वेक्षणात छगन भुजबळच 'बाहुबली'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून गेल्या महिनाभरापासून महायुतीत घमासान सुरू आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची एकतर्फी घोषणा केल्यानंतर महायुतीत वादाला सुरुवात झाली होती. भाजपने गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध करत या मतदारसंघावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी आग्रह धरला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांची उमेदवारी थेट दिल्लीतून निश्चित झाल्याची माहिती पुढे आली. खुद्द भुजबळ यांनीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत दिल्लीतून आपल्याला निवडणूक लढविण्याचे सांगितले गेल्याचे स्पष्ट केले. मात्र गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक दोन नव्हे, तर तब्बल तीन वेळा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीवर हक्क सांगितला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ, पालकमंत्री दादा भुसे यांनीही नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचाच दावा कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे उमेदवारीवरून महायुतीत जोरदार संघर्ष सुरू आहे. शिंदे गटापाठोपाठ मराठा समाजानेही भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा बसविण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. त्यासाठी एक-एक जागा काबीज करणे महत्त्वाचे असल्याने भाजपने संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकबाबत सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने तत्काळ सर्वेक्षण करून उमेदवारी निश्चितीचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणादरम्यान भाजप, शिंदे गटातून उमेदवारीसाठी अन्यही काही नावे पुढे आली होती. परंतु, सर्वेक्षणात भुजबळ यांचेच नाव आघाडीवर असल्याचे समोर आले. त्यामुळे उमेदवारीसाठी भुजबळ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button