जलसंकटाचे सावट : पाण्याच्या टँकरची मागणी वाढली | पुढारी

जलसंकटाचे सावट : पाण्याच्या टँकरची मागणी वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत आहे. सध्या महापालिकेकडून नागरिकांना दिवसाला जवळपास दीड हजार टँकर पुरवले जातात. दरम्यान, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये 46 हजार 94 टँकरची वाढ झाली असून, फक्त मार्च महिन्यात महापालिकेने तब्बल 38 हजार 299 टँकर पाणी पुरविले आहे. या संख्येत एप्रिल व मेमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. याशिवाया ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या परिसपर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने शहरात विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेसह ठेकेदारांच्या टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एका ठेकेदाराकडे किमान 8 टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.

समाविष्ट गावांसह उपनगरांमधून टँकरची मागणी वाढली आहे. समाविष्ट गावांत काही ठिकाणी चार, तीन, दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सूस, म्हाळुंगे, पिसोळी या गावांना चार दिवसांतून, होळकरवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांना तीन दिवसांतून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी या गावांत प्रतिदिन 1 हजार 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षी हाच आकडा प्रतिदिन दीड हजारावर पोहोचला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये 46 हजार 94 टँकरची वाढ झाली असून मार्च महिन्यात तब्बल 38 हजार 299 टँकरने पाणी पुरविले आहे.

 थेंबभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण

घेरा सिंहगड, अतकरवाडी (ता. हवेली) येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत 92 लाख रुपयांची निकृष्ट पाणी योजना फसली आहे. त्यामुळे पाणीटंचाईने अतकरवाडी घेरा सिंहगड व परिसरातील दोन हजारांवर रहिवासी हैराण झाले आहेत. निकृष्ट काम करून अधिकारी व ठेकेदार मात्र मालामाल झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने या योजनेत अतकरवाडीच्या डोंगरात पाण्याची टाकी उभारली. खडकवासला धरणावरून जलवाहिनीही टाकली. मात्र, जलवाहिनी सतत फुटत असल्याने टाकीत पाणी गेलेच नाही. त्यामुळे या योजनेचे थेंबभरही पाणी आदिवासी व इतर समाजाला मिळालेले नाही. निविदेप्रमाणे जलवाहिनी टाकलेल्या नाहीत. तीन फूट खोदकाम न करता वर वर खोदकाम करून वेगवेगळ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पंप ही कमी क्षमतेचा बसविला आहे.

हेही वाचा

Back to top button