Lok Sabha Election 2024 : अमरावतीमध्ये बहुरंगी लढत?

Lok Sabha Election 2024 : अमरावतीमध्ये बहुरंगी लढत?

बहुचर्चित अमरावती मतदार संघात यावेळी निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत असतानाच आ. बच्चू कडू यांनी दंड थोपटत 'प्रहार'चा उमेदवार देत दोन्ही पक्षांपुढे आव्हान उभे केले. भरीस भर म्हणून 'वंचित'ने देखील आपला उमेदवार दिला असून, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी आपण अमरावतीतूनच लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे बसपाचा उमेदवार ठरला नसला तरी आता अमरावतीची लढत बहुरंगी होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍या शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पुत्र अभिजित अडसूळ यांना 'प्रहार'कडून उमेदवार देण्यात आल्यामुळे आपण लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, नामांकन अर्ज घेऊन ठेवल्याने अनिश्चितता कायम आहे. विरोधकांची ही लढत भाजपपेक्षा नवनीत राणा यांच्याविरोधात अधिक आहे.

शिवसेना, भाजपकडून प्रचंड विरोध असतानाही खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखेडे रिंगणात आहेत. लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार असतानाच 'प्रहार'चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी तिसरा पर्याय म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दिनेश बुब यांना अमरावतीत उमेदवारी दिली. आहे. राणा यांच्यासाठी जसा हा मोठा धक्का आहे, तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठीदेखील धोक्याची घंटा आहे. कारण दिनेश बुब हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. आघाडीकडे त्यांनी शिवसेनेतून उमेदवारीही मागितली होती. यामुळे मतविभाजन अटळ आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे यापैकी सहाच विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा, तर उर्वरित दोन वर्धा लोकसभा मतदार संघात आहेत. तीन विधानसभा या काँग्रेसकडे, तर दोन विधानसभा या बच्चू कडू यांच्या 'प्रहार'कडे आहेत. एक विधानसभा अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आहे. भाजपकडे धामणगाव रेल्वे हा एकच विधानसभा मतदारसंघ असून तो देखील वर्धा लोकसभेमध्ये असल्याने भाजपला आमदार रवी राणा यांच्या एका मतदार संघाच्या बळावर आणि आपल्या परंपरागत हिंदुत्ववादी मतदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. तीन विधानसभा ताब्यात असलेल्या काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. त्या खालोखाल 'प्रहार'चे वजन जिल्ह्यात आहे. बच्चू कडू यांनी तिसरा पर्याय उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मतावर लक्ष केंद्रित केले आहे. मुळात भाजपचा मोठा वर्ग, दोन्ही शिवसेना या नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटावर उमेदवारी संदर्भात अन्याय झाल्याची भावना कुठे उघड तर कुठे दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये आहे. आनंदराव अडसूळ यांचे समर्थन 'प्रहार'च्या उमेदवाराला मिळाल्यास लढत रंगतदार होणार आहे.

महायुतीत राणा यांना विरोधच

महायुतीचा विचार करायचा झाल्यास भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. त्यामुळे राणा यांची वाट 2024 च्या लोकसभेत बिकट असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपसमोर विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा अंतर्गत विरोधाचे मोठे आव्हान आहे. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि प्रहारसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय खोडके हे देखील नवनीत राणा यांचे राजकीय विरोधक आहेत. 2024 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात निवडणूक लढणार्‍या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात अडसूळ जिंकले. मात्र, नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आता सुनावणी पूर्ण होऊन निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. तो निकाल येण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी भाजपने उमेदवारी कशी दिली, एकाला एक तर दुसर्‍याला हा न्याय का, एकूणच असा सूर व्यक्त होत आहे. अमरावती येथील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे. ही लढत भाजप आणि काँग्रेससाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच 'प्रहार'च्या अस्तित्वासाठी देखील महत्त्वाची आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने याच दिवशी खरी लढत कोणामध्ये आहे, हे स्पष्ट होणार आहे.

वंचित आणि रिपब्लिकन फॅक्टर

अमरावती लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. एकेकाळी रिपाइं नेते स्व. रा.सू. गवई यांच्या काळात रिपाइंचा दबदबा जिल्ह्यात होता. गवई गटाकडून डॉ. राजेंद्र गवई अमरावती लोकसभा लढणार आहेत. तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरदेखील आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली आहे. यासह बहुजन समाज पक्षाचे केडरही या मतदार संघात आहे. बसपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. आंबेडकरवादी मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news