Hingoli Fire: वसमतमध्ये हळदीच्या गोदामाला आग; कोट्यावधींच्या नुकसानीचा अंदाज | पुढारी

Hingoli Fire: वसमतमध्ये हळदीच्या गोदामाला आग; कोट्यावधींच्या नुकसानीचा अंदाज

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमतजवळ असलेल्या साई ॲग्रो इंडस्ट्रीजच्या गोदामाला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि.२५) पहाटे ही आग लागली असून, काही वेळातच आगीने रौद्ररूप धरणे केले. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आग विझविण्यासाठी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्हयातील अग्नीशमन दलाचे 12 बंब बोलावण्यात आले आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Hingoli Fire)

वसमतमधील हळदीचे प्रसिध्द व्यापारी लक्ष्मीकांत उर्फ गट्टूसेठ मुरक्या यांची ही कंपनी असून या ठिकाणी हळदीचे गोदाम आहे. सुमारे 10 एकर क्षेत्रावर हे गोदाम आहे. याठिकाणी हळद खरेदी करून ठेवण्यात आली आहे. याशिवाय प्रक्रिया केलेली हळद देखील इथे ठेवली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यातही हळद पाठवली जाते. याठिकाणी सुमारे 40 पेक्षा अधिक कामगार काम करत असल्याची माहिती आहे. (Hingoli Fire)

दरम्यान, सोमवारी सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे तेथील रखवालदाराच्या लक्षात आले. गोदामाला आग लागल्याचे दिसताच त्यांनी तातडीने मुरक्या यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस व पालिका प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी धावले. आगीचेे रौद्ररुप लक्षात घेतात तातडीने अग्नीशमनदलास पाचारण करण्यात आले. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयातील 12 अग्नीशमनदलाच्या बंबाद्वारे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु असून सुमारे पाच तासानंतरही आग आटोक्यात आली नाही, असेही बचाव पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Hingoli Fire)

दरम्यान, जेसीबी मशीनच्या मदतीने गोदामावरील व बाजूचे पत्रे काढून आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या गोदामात नेमकी किती क्विंटल हळद होती याची माहिती मिळू शकली नाही.

Back to top button