Lok Sabha Election Maharashtra: ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनाे, हे शब्‍द कुठे गेले?’ : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल | पुढारी

Lok Sabha Election Maharashtra: 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनाे, हे शब्‍द कुठे गेले?' : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क:  शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावरील ‘INDIA’ आघाडीच्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो…’ हा शब्द टाळला, असा दावा करत उद्धव ठाकरे यांच्या मनातील हिंदुत्त्व कुठे गेले?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १८ मार्च)  पत्रकार परिषदेत केला. (Lok Sabha Election Maharashtra) आम्ही  टीका करण्यापेक्षा विकास कामांना महत्त्व दिले. महायुतीची सर्व कामे जनतेसमोर आहेत, त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत दिसेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई उपस्थित होते. (Lok Sabha Election Maharashtra)

माझ्‍या तमाम हिंदू बांधवांनाे, असे संबाेधून बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरील शिवसेनेची सभेला प्रारंभ करत असत. मात्र काल शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्‍या सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो…’ हा शब्द टाळला. त्‍यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा साेडल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. आम्‍ही बाळासाहेब ठाकरे यांच्‍या वैचारिक बांधिलकीशी ठाम आहाेत. आम्‍ही याबाबत काेणतीही तडजाेड केलेली नाही, असेही शिंदे या वेळी म्‍हणाले. (Lok Sabha Election Maharashtra)

कालची ‘इंडिया’ आघाडीची सभा म्हणजे ‘फॅमिली गॅदरिंग’

रविवार, १७ मार्चला शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावरील ‘INDIA’ आघाडीच्या सभा झाली. ही सभा म्‍हणजे इंडिया  आघाडीचे  फॅमिली गॅदरिंग होते. हद्दपार लोकांनी घेतलेली सभा असल्याचे भासत होते”, अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. Lok Sabha Election Maharashtra)

महाराष्ट्रविरोधी व्यक्तींबरोबर बसणे दुर्दैवी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्दूल्ला हे जम्‍मू-काश्‍मीरमद्‍ये महाराष्ट्र सदन उभारण्यास विरोध करत आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे   मांडीला मांडी लाऊन बसतात, हे दुर्दैव आहे. भाजप हरवणं सोपं नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला देशात मोठे यश मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Election Maharashtra)

महायुतीने २ वर्षात राज्यात भरीव काम केले

गेल्या दाेन वर्षात महायुती सरकारने राज्यात अनेक भरीव कामे केली. अनेक क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. अनेक रखडलेले विकास प्रकल्प आमच्या सरकारच्या कार्यकाळात राबविले गेले. आमच्या आदीच्या सरकारने ज्या कामांना ब्रेक लावला होता, त्याला आमच्या सरकारने वेग दिला. आगामी लोकसभा निवडणुकात आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्‍हणाले.

महायुतीची यादी लवकरच…

महायुतीच्या जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत, तिन्ही पक्षात समन्वय आहे. समन्वयाने जागावाटपासंदर्भात मार्ग काढला जाईल. लवकरच महायुतीची उर्वरित यादी जाहीर केली जाईल, असेही त्‍यांनी यावेळी स्पष्ट केले. (Lok Sabha Election Maharashtra)

हे ही वाचा:

Back to top button