नाशिक : … म्हणून महाराष्ट्राला स्थान नाही; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका | पुढारी

नाशिक : ... म्हणून महाराष्ट्राला स्थान नाही; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे टोळीतील खासदार खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येऊच शकत नाही, असा दावा करत महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळेच भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्राला स्थान मिळू शकले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे केली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांचे ठाकरे गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. भाजपने महाराष्ट्रात केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे अस्थिरता आहे. ही बाब भाजपच्या हाय कमांडला कळाली आहे. माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी लोक तयार नाही. या उलट देशात इंडिया आघाडीची परिस्थिती अत्यंत भक्कम असून, मित्र पक्षांबरोबर बोलणे सुरू आहे. दिल्लीत आप सोबत तसेच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व लवकरच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबतची चर्चा पूर्ण होईल. महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची महाविकास आघाडी निश्चित झाली आहे. आता सर्व बैठका संपल्या असून, निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आमच्या उमेदवारांना अनौपचारिकपणे कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीची यादी जाहीर करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे, असा दावाही खा. राऊत यांनी केला.

गोडसे, पवार निवडून येणे कठीण
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या संभाव्य उमेदवारांवरही राऊत यांनी टीका केली. नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांचे डिपॉझिट जप्त होईल. तर दिंडोरीमधील खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे निवडून येणे कठीण असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

हेही वाचा:

Back to top button