आंबेडकर वसाहत पॅटर्न राज्यात राबवू; खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही | पुढारी

आंबेडकर वसाहत पॅटर्न राज्यात राबवू; खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही

बारामती; पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे काम नावीन्यपूर्ण, दर्जेदार व कमी जागेत अत्यंत चांगले होत आहे. झोपडपट्टीमुक्त शहर ही संकल्पना राबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामती शहरातील आमराई परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या कामाची पाहणी खासदार सुळे यांनी शुक्रवारी (दि. 27) केली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या माजी नगरसेवक बिरजू मांढरे यांनी त्यांना विस्तृत माहिती दिली.

या प्रसंगी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, आरती शेंडगे, नवनाथ बल्लाळ, मयूरी शिंदे, अनिता जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, तालुकाध्यक्षा वनिता बनकर आदींची उपस्थिती होती.

शहराचा विकास झपाट्याने होत असताना झोपडपट्टीमुक्त बारामती संकल्पना राबविण्यात यशस्वी झालो. यामध्ये सर्व स्थानिक रहिवासी व पदाधिकारी यांनी दिलेली मोलाची साथ दिल्याचे सांगितले. डॉ आंबेडकर वसाहतीच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व सूक्ष्म बाबींमध्ये अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाने दिलेली खंबीर साथ, यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणार्‍यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्ष नेहमी गोरगरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे जय पाटील यांनी सांगितले. स्वागत बिरजू मांढरे, प्रियंका मांढरे, धनंजय तेलंगे, किरण बोडरे, सचिन मांढरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. कृष्णा कांबळे यांनी आभार मानले.

Back to top button