Rohit Pawar | ‘ट्रिपल इंजिन’नं स्वत:ला ‘जंबो इंजिनला’ जोडून मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न सोडवावा- रोहित पवार | पुढारी

Rohit Pawar | 'ट्रिपल इंजिन'नं स्वत:ला 'जंबो इंजिनला' जोडून मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न सोडवावा- रोहित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्रपती संभाजीनगरात आज (दि.१६ सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्याच्या हिताचा विचार करून, स्वतःच्या ‘ट्रिपल इंजिन’ ला दिल्लीच्या ‘जंबो इंजिन’ची जोड देऊन दुष्काळामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवावेत, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सरकारला केली आहे. त्यांनी ‘X’ वरून (पूर्वीचे ट्विटर) यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. (Rohit Pawar)

मराठवाड्यातील आजची परिस्थिती बघता, राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे. पाऊस नसल्याने खरीप तर हाताचा गेलाच, पण पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा या समस्येलाही तोंड द्यावं लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्याला सामान्य कुटुंबातील मुलांना शाळेची फी भरणही कठीण आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी, अशीअपेक्षा देखील रोहित पवार यांनी सरकारकडे व्यक्त केली आहे. (Rohit Pawar)

Rohit Pawar : सरकारने ‘दुष्काळ’ जाहीर करून, शेतकऱ्यांना धीर द्यावा

मराठवाड्यात गेल्या १०५ दिवसांपैकी केवळ ३० दिवस पाऊस झाला. ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने खरीप हंगाम पूर्णत: नष्ट झाला आहे. सरकारने दुष्काळ घोषित करण्याचे जाहिर केलेले निकष २०१६ मधले असून, ७ वर्ष जुने आहेत. गेल्या सात वर्षात हवामानात खूप काही बदल झाले आहेत. या निकषांच्या आधारे चार कळ (Triger) लागू होईपर्यत थांबलो तर शेतकरी आयुष्यातून उठेल. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तांत्रिक निकष बाजूला ठेवत, त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे.

शाश्वत शेतीसाठी विशेष योजना आणणं गरजेचं

नापिकीला कंटाळून मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यात ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्यासंदर्भात अतिशय धक्कादायक अहवाल दोन महिन्यांपूर्वी आला होता. त्या अहवालास शासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मराठवाड्यात कोरडवाहू शेतकरी अधिक असून, बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. बेभरवशाच्या हवामानात शेती व्यवसाय शाश्वत राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी विशेष योजना आणणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळाची आजची बैठक अत्यंत महत्वाची असल्याने मराठवाड्याला अपेक्षित निर्णय होतील अशी आशा करुयात!, असे देखील आमदार रोहित यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button