पुढारी ऑनलाईन : सत्ताधारी भाजप सरकारच्या देशातील राजकीय अजेंड्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण प्रभावित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या शासनकाळातील परराष्ट्र धोरणाची कठोर चिकित्सा करण्याती वेळ आली आहे, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत 'X' ( पूर्वीचे ट्विटर) वरून व्यक्त केले आहे.
या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी 'Foreign Policy' या अमेरिकन प्रकाशनातील 'मोदींच्या 'टायगर वॉरियर' मुत्सद्दीपणाचा भारताच्या हितसंबंधांना हानी पोहोचवत आहे' या लेखाचा हवाला देत पंतप्रधानांच्या देशातील धोरणांमुळे परराष्ट्र धोरण प्रभावित झाल्याचे (Supriya Sule) म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युरोपियन संसदेत मणिपूर संदर्भात ठराव येतो. भूभागावरील हक्क आणि वादग्रस्त नकाशे प्रकाशित केल्यामुळे आपल्या तटस्थ मित्रराष्ट्रासोबतचे संबंध ताणले जातात. या घटनांवरून देशातील धार्मिक व वांशिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील राजकीय अजेंड्यामुळे परराष्ट्र धोरण प्रभावित झाले आहे हे नाकारता येत नाही, असेही सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे.
देशातील धार्मिक व वांशिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवर अतिशय गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. जगाचं या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट देशातील जनतेपासून किंवा जगापासून लपवू शकत नाही. जग आपल्याला बघतेय, हे विसरता कामा नका, असा सल्लाही सुळे यांनी सत्ताधारी भाजप सरकारला (Supriya Sule) दिला आहे.