राज्यातील 142 नद्यांमधील गाळ काढण्याचे धोरण निश्चित | पुढारी

राज्यातील 142 नद्यांमधील गाळ काढण्याचे धोरण निश्चित

शिवाजी शिंदे

पुणे :  राज्यात असलेल्या लहान-मोठ्या 142 नद्यांमधील सुमारे 1 हजार 650 किलोमीटर लांबीत साचलेला गाळ पहिल्या टप्प्यात काढण्यात येणार असून, त्याबाबतचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. या धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात पालघर जिल्ह्यातील सूर्या- 48 कि.मी., वैतरणा-85 कि.मी. आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्णा-70 कि.मी. या नद्यामध्ये इतर नद्यांपेक्षा सर्वाधिक लांब किलोमीटर साचला असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध नद्यांना आलेल्या मोठ-मोठ्या पुरांमुळे नदीच्या काही भागात गाळ साचतो. त्यामुळे नद्यांचे पात्र अपुरे होत गेले.

परिणामी, आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेली शहरे, गावे यांना मोठ्या प्रमाणावर समस्यांचा अडथळा पार करावा लागतो. याबरोबरच पुराच्या पाण्यामुळे डोंगर भागातील भूस्खलनामुळे माती, दगड, गोटे, रेती असे विविध पदार्थ वाहून आल्यामुळे सखल भागात ते जमा होतात हळूहळू नदीपात्रात गाळ तयार होऊन त्याची बेटे तयार होतात. तसेच पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण होतात. याबरोबरच नदीचे पात्र अरुंद व उथळ देखील होते. नदीपात्रात अशा प्रकारे साचलेला गाळ, अडथळे काढण्याबाबत शासानाने नुकतेच धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी जलसंपदा आणि महसूल विभाग यांनी एकत्र येऊन काम करावे, अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले परिपत्रक शासनाने नुकतेच जारी केले आहे. जलंसपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने पुढाकार घेणे, त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभा करणे, ही यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला.

दीर्घकालीन उपाययोजना अशा…
नदी खोर्‍यातील तीव्र उतारावरील मातीच्या धुपीच्या तीव्रतेनुसार छोटे-छोटे पाणलोट क्षेत्र निर्धारित करणे
वृक्षतोडीवर कायमस्वरूपी बंदी, जंगल विभागात झाडांची पुन्हा लागवड करण्यावर भर
नदीकाठच्या दोन्ही बाजूने झाडे लावल्यास धूप थांबण्यास होणार मदत
वृक्ष लागवडीचे काम महसूल विभागाने करणे बंधनकारक
नदीपात्रात पुन्हा गाळ येऊ नये, यासाठी जैविक व अभियांत्रिकी विभागांनी उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे

हेही वाचा :

संतापजनक ! कोंढव्यात ’पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

हिमाचलमध्ये पाऊस, भूस्खलनामुळे ७१ जणांचा मृत्यू; लष्कर मदतीला

Back to top button