हिमाचलमध्ये पाऊस, भूस्खलनामुळे ८१ जणांचा मृत्यू; लष्कर मदतीला | पुढारी

हिमाचलमध्ये पाऊस, भूस्खलनामुळे ८१ जणांचा मृत्यू; लष्कर मदतीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुसळधार पाऊस, ढगफुटी यामुळे झालेले भूस्खलन आणि अचानक आलेल्या पूरांमुळे हिमाचल प्रदेश निसर्गाच्या प्रकोपात अडकला आहे. गेल्या चार दिवसांत तिथे ८१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळली असून जखमींना वाचवण्याचे आणि ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कांगरा जिल्ह्यात पोंग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली, यामध्ये १७०० हून अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि भूस्खलनामुळे संपूर्ण राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या राज्यात येत्या 19 ऑगस्टपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ढगफुटी, भूस्खलन व पावसामुळे घडलेल्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जात आहे. सिमला येथे समर हिल, कृष्णानगर आणि फागली भागांत भूस्खलनामुळे परिस्थिती दयनीय बनली आहे. सततच्या पावसाने लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

शिमल्याच्या समर हिल भागातील प्रसिद्ध शिव बावडी मंदिर येथे झालेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून शोध पथकांनी बुधवारी १३ वा मृतदेह बाहेर काढला. पावसामुळे अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे आठशे मार्ग बंद झाले आहेत. उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान सुरूच आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button