Rain Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता | पुढारी

Rain Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या सर्वच भागांत उघडीप दिलेला पाऊस काही भागांत सक्रिय झाला आहे. उर्वरित भागांतही तो सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात शुक्रवारनंतर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी असलेला मान्सूनचा आस (ट्रफ) पुन्हा आहे त्या जागेवर येण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही प्रक्रियांमुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता बळावली आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या सुमारे वीस दिवसांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या पाच दिवसांत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संस्थास्तरावरील प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत !

मूग, उडदाचे उत्पादन घटणार ; पावसाअभावी पेरणीचा हंगाम वाया गेल्याचा परिणाम

Back to top button