PM Crop insurance | शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मुदतवाढ, जाणून घ्या अर्ज कसा करायचा?  | पुढारी

PM Crop insurance | शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मुदतवाढ, जाणून घ्या अर्ज कसा करायचा? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान पीक विमा (PM Crop insurance) योजनेला खरीप २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. नियुक्त करण्यात आलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत होती. ही तारीख वाढवत ती ३ ऑगस्ट करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मुदत वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या कसा अर्ज करायचा. (PM Crop insurance)

Crop Insurance
Crop Insurance

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज करण्याची तारीख वाढवली असून, शेतकऱ्यांनी  आपला विमा अर्ज भरुन घेण्यास आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे की, “या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा.”

पीक विमा योजना हप्ता किती?

चालू खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ रु. १/- विमा हप्ता भरावयाचा आहे. या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या

कोणत्या आपत्तींचा समावेश?

या योजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, भू-सख्खलन, पावसातील खंड, किड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबीमध्ये समाविष्ट केलेली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढनी पश्चात नुकसान यांचा जोखमीच्या बाबींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

PM Crop insurance : कोणत्या पिकांचा समावेश? 

सर्व प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम २०२३-२४ करिता पीक निहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे – बाजरी – विमा संरक्षित रक्कम ३०,०००/- मका – विमा संरक्षित रक्कम रु.३५,५९८/- मुग – विमा संरक्षित रक्कम रु.२०,०००/- उडीद – विमा संरक्षित रक्कम रु.२०,०००/- भुईमुग – विमा संरक्षित रक्कम रू.४२,९७१/- सोयाबीन – विमा संरक्षित रक्कम रु.४९,५००/- खरीप कांदा – विमा संरक्षित रक्कम रु.८१,४२२/-

भरपाईची प्रक्रिया काय?

पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२ तासांच्या आत पीक विमा ॲप, कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे लागणार आहे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अतंर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरण्यात येणार आहे.

अर्जाची कसा करावा?

शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे व पीक विमा भरण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा राष्टीयकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी महा ई सेवा केंद्र,सामुदायिक सुविधा केंद्र,ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र,राष्ट्रीयकृत बँका येथून पीक विमा काढू शकतील.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आवश्यक असलेली कागदपत्रे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक परेणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा

Back to top button