Crop Insurance : पीकविमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ; ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरता येणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे | पुढारी

Crop Insurance : पीकविमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ; ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरता येणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : पीकविमा (Crop Insurance)  भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली. पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Crop Insurance)  सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्र सरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button