भाव वाढीमुळे 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणे केले बंद, तर 46 टक्के लोकांनी एक किलोसाठी मोजले 150 रुपये, सर्वेक्षणातून माहिती समोर | पुढारी

भाव वाढीमुळे 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणे केले बंद, तर 46 टक्के लोकांनी एक किलोसाठी मोजले 150 रुपये, सर्वेक्षणातून माहिती समोर

पुढारी ऑनलाईन: गेल्या तीन आठवड्यांत देशातील विविध शहरांमध्ये टोमॅटोच्या दरात अनेक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले. यावर लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात टोमॅटोची खरेदी आणि वापर याबाबत एक रंजक आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात 46 टक्के कुटुंबं आता एक किलो टोमॅटोसाठी 150 रुपयांपेक्षा पेक्षा जास्त पैसे मोजत आहेत, तर त्याचवेळी 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणे बंद केले आहे. तसेच 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केल्याची माहिती समोर आली आहे.

टोमॅटोचे भाव अचानक वाढले

राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव 24 जून रोजी 20-30 रुपये प्रति किलोवरून 180 रुपये किलो झाले. चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची किंमतही 220 रुपये किलोवर गेली आहे. इतर शहरांमध्ये आणि तामिळनाडू, केरळसारख्या देशातील काही राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव आजही 180 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. टोमॅटोचे काही प्रकार तर त्याहूनही महागात विकले जात आहेत. उदाहरणार्थ, ‘देशी’ टोमॅटोचे भाव काही शहरांमध्ये 180-250 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर संकरित आणि हिरवे टोमॅटो स्वस्त आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 150 ते 180 रुपये प्रति किलो या दराने संकरित आणि हिरवे टोमॅटो विकले जात आहेत.

दिल्लीत टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू झाली

ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (ANCCF) यांना एकाच वेळी प्रमुख उपभोग केंद्रांवर वितरणासाठी टोमॅटोची खरेदी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे मालाची मर्यादित उपलब्धता असूनही गेल्या शुक्रवारपासून (१४ जुलै) दिल्लीत टोमॅटो ९० रुपये किलोने विकायला सुरुवात झाली आहे.

यामुळे अनेक जण सर्वेक्षणात सहभागी

लोकल सर्कलने सर्वेक्षणासाठी भारतातील 342 जिल्ह्यांतील नागरिकांकडून 22,000 हून अधिक प्रतिसाद गोळा केले. यामध्ये 65 टक्के पुरुष आणि 35 टक्के महिला होत्या. 42% टियर 1, 34% टियर 2 आणि 24% प्रतिसादकर्ते टियर 3, 4 आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते. सर्वेक्षण केलेल्या 87% ग्राहकांनी सांगितले ते एक किलो टोमॅटोसाठी टोमॅटोसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजतात.

त्यामुळे अनेकांनी टोमॅटो वापरणे बंद केले

टोमॅटो खरेदी करताना एक किलोसाठी 100 रुपये देणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी 27 जून ते 14 जुलै या दरम्यान १८ टक्क्यांवरून 87% पर्यंत वाढली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केल्याचे सूचित केले आहे, तर 14 टक्के कुटुंबांनी सध्या ते वापरणे बंद केले आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणे बंद केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तसेच 35 टक्के लोकांनी वापरात लक्षणीय घट केली आहे. 33 टक्के लोकांनी ते अंशतः कमी केले आहे आणि केवळ 16 टक्के लोकांनी वापर सामान्य ठेवला आहे आणि टोमॅटो खरेदी करण्यासाठी अधिक पैसे दिले आहेत.

हेही वाचा:

Maharashtra Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी एका महिन्यात टोमॅटो विकून बनला करोडपती ! जाणून घ्या सविस्तर

Ravindra Mahajani : खेळ कुणाला दैवाचा कळला?, रवींद्र महाजनी यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं?

पुणे: मांगूरची वाहतूक करणारा टेम्पो पकडला, १ हजार ८०० किलो मासे केले नष्ट

 

Back to top button