

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्यासह नऊ नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. या फुटीमागे अजित पवारांची नाराजी हे फक्त एकमेव कारण नसल्याचे पुढे येत आहे. या मागे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जात आहे. (Praful Patel role in NCP split)
प्रफुल पटेल युपीए काळात नागरी विमान मंत्री होते. त्यांच्या काळात एअर इंडियाने केलेली विमान खरेदी ही वादग्रस्त ठरली होती. यासंदर्भात पटेल यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू आहे.
शरद पवार यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. याच दरम्यान Gulf Times या वेबसाईटवर भारतातील पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक लेख लिहिला होता. यात त्या म्हणतात, "प्रफुल पटेल यांचा भाजपशी आणि भाजपशी जवळीक असलेल्या एका अब्जाधिश उद्योगपतीशी फार चांगला संपर्क आहे. प्रफुल पटेल यांच्याविरोधात सीबीआयच्या काही केसेस आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. पवार यांच्यानंतर राजकारणात आपल्याला काही भवितव्य नाही, असे त्यांना वाटते. अजित पवारांनी आपली राजकीय भूमिका बदलावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत."
पुढारी ऑनलाईनने अधिक माहितीसाठी चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी याच दरम्यान त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी प्रफुल पटेल आणि या उद्योगपतीची भेट झाली होती, पटेल यांना स्वतःचे भवितव्य आणि त्यांचे काही जुने रेकॉर्ड आहेत त्यांची काळजी जास्त होती, असे शर्मा या व्हिडिओत म्हणतात. (Praful Patel role in NCP split)
स्वाती चतुर्वेदी यांनी त्यांच्या लेखात अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचे म्हटले होते. त्या म्हणतात, "जर अजित पवार पुरेसे आमदार सोबत घेऊन आले तर एकनाथ शिंदे यांना बाजूला करून तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी ऑफर देखील भाजपच्या एका नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे," असे हे चतुर्वेदी यांनी या लेखात लिहिले होते.
ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना या संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, "प्रफुल्ल पटेल यांची एअर इंडियाच्या संदर्भात २०१४ पासूनच ईडीकडून चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावे, अशी पटेलांची इच्छा २०१४ पासूनची आहे. पण राष्ट्रवादीची महाराष्ट्रातील व्होटबँक ही शेतकऱ्यांची असल्याने पवार यांना काँग्रेससोबतच आघाडी ठेवायची होती." आनंदन या 'नॅशनल हेराल्ड'च्या सल्लागार संपादक आहेत.
पार्थचा पराभव दादांच्या जिव्हारी
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबातील एकाही व्यक्तीने निवडणूक गमावलेली नाही, अपवाद फक्त पार्थ पवार यांचा! लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवार यांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागलेला आहे. तर शरद पवार यांना रोहित पवार यांना राजकारणात पुढे न्यायचे आहे, असे निरीक्षण सुजाता आनंदन यांचे आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी स्वतःला राजकारणातून बाजूल करून आपल्याकडे पक्ष सोपवावा, अशी अजित पवारांची भूमिका होती, पण ती काही यशस्वी झाली नाही.
हेही वाचा