नगर : ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी राज्यातील पहिला अभिनव उपक्रम | पुढारी

नगर : ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

नगर : पुढारी वृत्तसेवा :  देशाचा खर्‍या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

14 व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत स्वचछ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलन व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, राहुल शेळके, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच गावांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर देण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 4 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गावातील विविध समस्या सोडवून गावाचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. राज्यातील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार निर्मितीवर शासन भर देत आहे. जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात आलेल्या विद्युत घंटागाड्या अहमदनगरमधील एमआयडीसीतील उद्योग समुहात तयार झाल्या असून ही अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसंख्या वाढीमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचर्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत घंटागाड्या असल्याने पेट्रोल व डिझेलचा खर्च वाचून गावाची स्वछता होणार आहे. या घंटागाड्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचातींना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतुन निधीची तरतूद करण्यात येईल, असे खा. विखे म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्रास्ताविक केले. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींना पुढे येण्याची गरज असून कचरामुक्त गाव ही संकल्पना राबविणे आवश्यक आहे. गावात या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ उभी राहिली पाहिजे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींना कचरा संकलन व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : 

पुण्यातील 350 महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात

नगर : बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाईचा बडगा

Back to top button