

नगर : पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून शहरातून फिरणार्या वाहनचालकांना 'खाकी'चा हिसका दाखविण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला शुक्रवारी (दि.30) स्वतः रस्त्यावर उतरले होते. कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी नाकाबंदी करून नियम मोडणार्या 106 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक लाख 53 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत इम्पेरियल चौक व रामचंद्र खुंट या दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
नियम मोडणार्या 24 वाहनचालकांना 46 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुतकरवाडी चौकात नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून चौकशी करण्यात आली. 82 वाहनचालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एक लाख 7 हजार 600 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला.
विनाक्रमांक वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल, ट्रिपलसीट वाहन चालविणे, वाहनाचे कागपत्र नसणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे अशा प्रकारच्या कारवाया करून दंड ठोठावण्यात आला. त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्या 16 जणांवर कारवाई करून तीन हजार 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः वाहनचालकांची कसून चौकशी केली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी नाकाबंदी करून कारवाई केली.
हे ही वाचा :