समृद्धी महामार्ग अपघात: ‘माझ्या पुढे फक्त राख आणि हाडे, यातून मी माझ्या ओवीला कसे शोधू’, हे ऐकताच सर्वांचा कंठ आला दाटून | पुढारी

समृद्धी महामार्ग अपघात: 'माझ्या पुढे फक्त राख आणि हाडे, यातून मी माझ्या ओवीला कसे शोधू', हे ऐकताच सर्वांचा कंठ आला दाटून

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांपूर्वी कोरोनामध्ये जन्मदात्या पित्याचे छत्र हरपले. ते दु:ख पचवून स्वतःला कसेबसे सावरून परिणीत वनकर यांनी संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. पंधरा वर्षांच्या संसार वेलीवर कळी उमलत नसल्याने त्यांनी ओवीला दत्तक घेतले. ओवीच्या लुडबुडीने, बागडण्याने घराला घरपण आले; मात्र परिणीत यांचे हे सुख नियतीला मान्य नव्हते. समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. १) झालेल्या अपघातात परिणीत यांची आई, पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या नशिबी एकांतवास उरल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

परिणीत वनकर (४५) यांची आई शोभा वनकर (६०), पत्नी वृषाली वनकर (३८) आणि मुलगी ओवी (२) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटीतील रहिवासी परिणीत वनकर यांची आई, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १) सकाळी वाहिन्यांवरील बातम्या पाहून सोसायटीतील रहिवाशांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांनीच परिणीत यांच्या घरी धाव घेतली; मात्र परिणीत यांच्या घराला कुलूप होते. परिणीत यांच्या शेजारी राहणारे त्यांचे मित्र सागर बिरारी यांनी दबकतच परिणीत यांना फोन लावला. मात्र, परिणीत बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते प्रचंड रडत होते. आपल्याला समजलेली बातमी खरी आहे, याची खात्री पटताच सोसायटीतही अनेकांनी हंबरडा फोडला. परिणीतचे मित्र, त्यांच्या पत्नीच्या मैत्रीणी, आईच्या भजनी मंडळातील महिला सर्वांनाच अश्रू अनावर झाले. काय करावे, हे कोणालाच कळत नव्हते. एका क्षणात परिणीत यांचा सोन्यासारखा संसार त्या अपघातात जळून खाक झाल्याच्या दु:खद भावना व्यक्त करत सोसायटीधारकांना अश्रू अनावर झाले होते.

वनकर कुटुंब जरवरी सोसायटीमध्ये २०१४ मध्ये रहायला आले होते. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या वडिलांना नातवंड हवे, अशी इच्छा होती; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे वनकर दाम्पत्याने २०२१ मध्ये नागपूर येथील आपल्या मित्राची मुलगी दत्तक घेतली. ज्या मित्राकडून मुलगी दत्तक घेतली, त्याला आधीही तीन मुली होत्या. तुला जर पुन्हा मुलगी झाली, तर ती मी दत्तक घेतो, असे सांगून वनकर यांनी ओवीला दत्तक घेतले होते. दोन वर्षांपूर्वी ओवीला आपल्या घरी आणले होते. दरम्यान, वनकर कुटुंबाने ओवीचा दुसरा वाढदिवसही खूप मोठा साजरा केला. मात्र, ओवीला दत्तक घेतल्यानंतर काही कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करायची राहिली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वनकर कुटुंब नागपूरला गेले होते. हे काम करून नंतर उन्हाळ्याच्या सुट्याही घालविण्याच्या दृष्टीने ते पंधरा-वीस दिवस तिकडेच राहिले. सर्व काम झाल्यानंतर ओवी, तीची आई आणि आजी पिंपळे सौदागरला परत येत होत्या; मात्र रस्त्यातच त्यांच्या बसचा अपपघात होऊन त्यामध्ये तिघींचाही मृत्यू झाला.

पहाटे कोणाशीच न बोलता सोडले घर

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आपली आई, पत्नी आणि मुलगी मरण पावल्याचे परिणीत यांना पहाटे समजले. त्यानंतर त्यांनी कोणालाही काही न सांगता आपल्या मेहुण्याबरोबर थेट अपघात स्थळ गाठले. सोसायटीतील ऱहिवाशांना याबाबत काहीच माहिती नव्हते. सकाळी टीव्हीवरील बातम्यांद्वारे त्यांना घटना समजली.

गेल्या नऊ वर्षांपासून सोसायटीचे रहिवासी…

परिणीत वनकर हे आपल्या कुटुंबासह २०१४ मध्ये जरवरी सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले. परिणीत हिंजवडी येथील एका मोठ्या कंपनीत नोकरी करतात. तर, त्यांची पत्नी वृषाली गृहिणी. आई ज्येष्ठ नागरिक असून भजनी मंडळाच्या सदस्या होत्या. दोन वर्षांपूर्वी परिणीत यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे आई, मुलगी, पत्नी हेच परिणीत यांचे विश्व होते.

ओवीसाठी घराची सफाई

शनिवारी घरातील सर्वजण येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी रात्री परिणीत यांनी आपला मित्र सागर बिरारी याच्याकडे घराची चावी देऊन उद्या कोणाकडून तरी घर साफ करून घे, ओवी येणार आहे, असे सांगतले होते. त्यानुसार, सागर यांनी घर साफ करायलाही सांगितले होते. मात्र, सफाई करण्यापूर्वीच नियतीने सगळे हिरावून घेतले होते.

वनकर कुटुंब खूप मनमिळावू होते. परिणीतची आई, पत्नी, मुलगी या सर्वांचाच स्वभाव खूप चांगला होता. ओवी तर दुडूदुडू पळत सर्वांच्या घरात जायची; मात्र आता ती पुन्हा कधीच दिसणार नाही, याचे खूप दुःख होत आहे.

– इंदू रामटेके, शेजारी

पंधरा – वीस दिवसांपूर्वीच ते नागपूरला गेले होते. नातेवाईकांचे लग्न आणि सुटीसाठी सर्वजण गेले होते. परिणीत आठ दिवसांपूर्वी सोसायटीत आला. आम्ही रोज भेटत होतो. शनिवारी सर्व येणार आहेत, असेही त्याने सांगितले होते. मात्र, शनिवारी सकाळीच ही धक्कादायक घटना घडल्याचे कळाले.
– सागर बिरारी, शेजारी

…अन सागर बिरारीही गहिवरले

परिणीत यांचे शेजारी आणि मित्र सागर बिरारी यांनी परिणीत यांना फोन लावला. त्या वेळी त्यांची मनस्थिती खूपच ढासळली होती. फोनवर बोलताना परिणीत सागर यांना म्हणाले की, माझ्या पुढे सर्व राख आणि हाडे आहेत. यातून मी माझ्या ओवीला कसे शोधू. हे ऐकताच सागर आणि त्यांच्या पत्नीचाही कंठ दाटून आला.

हेही वाचा:

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री शिंदे

समृद्धी महामार्गावरील अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एक आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं की…”

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

 

 

Back to top button