पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पावसाने राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावली आहे. दरम्यान, मंगळवार, २७ जून आणि बुधवार, २८ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार (Heavy to very Heavy Rainfall) पावसाचा इशारा देण्यात आला आहे,अशी माहिती आयएमडी पुणे विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी आज (दि.२६) दिली.
हवामान विभागाने आज (दि.२६ जून) दिलेल्या ताज्या बुलेटीननुसार, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना मंगळवारी (दि.२७ जून) तर बुधवारी (दि.२८ जून) पालघर, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Heavy to very Heavy Rainfall) देण्यात आला आहे. दरम्यान या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.२७ जून) जळगांव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी (दि.२८ जून) नाशिक, ठाणे, रायगड, सातारा, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा तर गुरुवारी (दि.२९ जून) पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे तसेच शनिवारी (दि.३० जून) रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.