

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी एकूण खर्चाच्या 25 ते 40 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के. पी. मोते यांनी दिली.
फुलांच्या लागवडीमध्ये कटफ्लॉवर्स या घटकासाठीची अल्पभूधारक शेतकर्यांसाठीची प्रतिहेक्टरी खर्चमर्यादा 1 लाख रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 40 हजार रुपये अनुदान दिले जाते. तर शेतकर्यांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी एक लाख असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये अनुदान मंजूर आहे.
कंदवर्गीय फुले घटकामध्ये अल्पभूधारक शेतकर्यांसाठी प्रतिहेक्टरी 1 लाख 50 हजार खर्चमर्यादेमध्ये एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये अनुदान दिले जाईल. इतर शेतकर्यांसाठी खर्चमर्यादा प्रतिहेक्टरी दीड लाख रुपये कायम असली तरी अनुदान 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रुपये दिले जाईल.
सुटी फुले घटकात अल्पभूधारकांसाठी प्रतिहेक्टरी खर्चमर्यादा 40 हजार रुपये इतकी मंजूर असून, अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 16 हजार रुपये दिले जाते. इतर शेतकर्यांसाठी ती 25 टक्के किंवा 10 हजार रुपये प्रतिहेक्टरी मंजूर आहे.
दरम्यान, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या घटकात 40 हजार खर्चमर्यादा मंजूर असून, त्यापैकी प्रतिहेक्टरी 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान शेतकर्यांना दिले जाते. तरी अधिकाधिक शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
विदेशी फळपीक लागवडीमध्ये ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी व अवॅकॅडो यांचा समावेश आहे. त्यामध्ये ड्रॅगनफ्रुटसाठी प्रतिहेक्टरी 4 लाख रुपये खर्च मर्यादा मंजूर असून, त्यापैकी 40 टक्के किंवा 1 लाख 60 हजार रुपये अनुदान आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रतिहेक्टरी 2 लाख 80 हजार रुपये खर्चमर्यादा असून, त्यापैकी एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तर अवॅकॅडोसाठी 1 लाख रुपये खर्चमर्यादा मंजूर असून, त्यापैकी 40 टक्के किंवा 40 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
मसाला पीक लागवडीमध्ये प्रामुख्याने बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांच्या प्रतिहेक्टरी खर्चमर्यादा 30 हजार रुपये मंजूर असून, त्या खर्चाच्या 40 टक्के म्हणजे 12 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच बहुवर्षीय मसाला पिकांसाठीची खर्चमर्यादा प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मंजूर आहे. तर एकूण खर्चाच्या 40 टक्के, तर 20 हजार रुपये अनुदानमर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: