दुधाच्या दरात चार रूपयांची घसरण ; ऐन उन्हाळ्यात दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत | पुढारी

दुधाच्या दरात चार रूपयांची घसरण ; ऐन उन्हाळ्यात दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

जामखेड : पुढारी वृतसेवा : गेल्या महिन्यात असलेले दुधाचे प्रतिलिटर 37 रुपये दर आज 33 रुपयांवर आले आहेत. आगामी काळात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच शेतीमालाला भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी दुधाचे दर कमी झाल्याने आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ्यात दुधाचे भाव कायम वाढलेले असतात. परंतु, यंदा दुधाचे भाव 4 रुपयांनी कमी झाल्याने शेतकर्‍यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 6 महिन्यात दुधाचे 3-5, 8-5 चा दर 37 रुपये लिटर होता.

त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीचे उत्पन्न घेण्याऐवजी जनावरांच्या चार्‍यासाठी शेतीचे क्षेत्र आरक्षित करत दूध व्यवसाय वाढविला होता. दुधाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जनावरांच्या खाद्यावर खर्च करत होता. दुधाला भाव असल्याने शेतकर्‍यांनी हरियाणा, पंजाब, बंगलोरवरून 30 ते 35 लिटर दूध देणार्‍या गायी घेतल्या आहेत. एका शेतकर्‍याच्या गोठ्यामध्ये 10 ते 15 गायी आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी दूध व्यवसायावर लाखो रुपये गुंतविलेले आहेत. दुधाला चांगले दर होते म्हणून शेतकर्‍यांनी मोठा खर्च करत दावणीला लाखोंची जनावरे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जनावरांचे आजारपण, पशुखाद्यासाठी लागणारा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे दुधापासून मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकर्‍यांच्या दूध व्यवसायाला चांगले दिवस आलेले असताना अचानक दुधाचे दर घसरले आहेत. गायीसाठी लागणार्‍या पशुखाद्याचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. सरकी, खपरी, गोळी आदींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे दुधाचे दर कमी झाले तर पशुखाद्याचे दर देखील कमी व्हावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच, वेगवेगळ्या दूध कंपनी नुसार दुधाचे भाव कमी-जास्त आहेत.

शेतकरी मुख्य व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत होता. परंतु, शेतमालाच्या भावाप्रमाणेच दुधाचे भाव देखील स्थिर राहत नसल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने भाव स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button