पुणे : पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. गणेश खिंड परिसरातील एका मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे कोर्टाचे आदेश असतानाही त्या जागेची मोजणी केली जात होती. सदर जागेचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत असल्याचे म्हटले आहे.
याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याच प्रकरणासंदर्भात साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत खडक पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरू करण्यात आला आहे.