महाविकास आघाडीच्या सरशीमुळे सभापती निवडीत होणार चुरस | (Maharashtra Legislative Council Chairman) | पुढारी

महाविकास आघाडीच्या सरशीमुळे सभापती निवडीत होणार चुरस | (Maharashtra Legislative Council Chairman)

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर आता सभापती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेतील 78 सदस्य संख्येपैकी 57 एवढी संख्या सध्या परिषदेत आहे. यात भाजपकडे 28 तर महाविकास आघाडीकडे 29 सदस्य आहेत. त्यामुळे ही निवडणूक घेणे भाजपसाठी सध्यातरी कठीण झाले आहे. (Maharashtra Legislative Council Chairman)

विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक- निंबाळकर हे यांची सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपली. एखाद्या सदस्याची मुदत संपते त्यावेळी सभापतिपदाची मुदतही संपुष्टात येते. त्यामुळे तेव्हापासूनच हे पद रिक्त आहे. उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडेच सध्या सभापती पदाचा कार्यभार आहे. (Maharashtra Legislative Council Chairman)

7 जुलै 2022 ला मुदत संपल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे 5 आणि ‘मविआ’चे 5 उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारती यांना संधी मिळाली. तर महाविकास आघाडीकडून रामराजे नाईक- निंबाळकर, एकनाथ खडसे, सचिन अहिर, आमश्या पाडवी, भाई जगताप, हे विजयी झाले. तर चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर लगेचच एकनाथ शिंदे यांचे राजकीय बंड झाले. त्यांनी शिवसेनेचे 40 तर अपक्ष 10 आमदार घेऊन सत्तांतर घडवले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन राहुल नर्वेकरांना निवडून आणले. मात्र, विधान परिषदेचे सभापतिपद आजही रिक्त आहे. याला सदस्यसंख्या हाच मुख्य मुद्दा ठरला आहे. (Maharashtra Legislative Council Chairman)

सध्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 9 जागा रिक्त आहेत. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका न झाल्याने स्वराज्य संस्थांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. स्वराज्य संस्थांमध्ये सोलापूर प्रशांत परिचारक, अहमदनगर अरुण जगताप, ठाणे रवींद्र फाटक, पुणे अनिल भोसले, सांगली सातारा मोहन कदम, नांदेड अमरनाथ राजूरकर, यवतमाळ सतीश चतुर्वेदी, जळगाव चंदुभाई पटेल, भंडारा गोंदिया डॉ. परिणय फुके असे नऊ सदस्यांची मुदत संपल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यपालांकडे पाठवलेल्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये उर्मिला मातोंडकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, नितीन बानगुडे-पाटील, एकनाथ खडसे, यशपाल भिंगे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, अनिरुद्ध वणकर, मुजफ्फर हुसैन, सचिन सावंत, रजनी पाटील अशा आघाडी सरकारच्या 12 नावांना मंजुरी मिळाली नाही.

मात्र, या यादीतील दोघांची मागाहून वेगळ्या मतदारसंघातून सोय लावण्यात आली. त्यामध्ये सचिन आहिर आणि एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 57 सदस्यांपैकी अमरावतीच्या निवडणूक निकालाचा निर्णय लागलेला नाही. उरलेल्या 56 सदस्यांपैकी 28 माविआ आणि 28 महायुती कडे आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक झाली तर मोठी चुरस पाहायला मिळेल.

अधिक वाचा :

Back to top button