पुढारी ऑनलाईन : भारतीय दंड संहितेतील बेदरकार वाहन चालवून एखाद्याचे आयुष्य धोक्यात आणण्याबद्दलचे कलम प्राण्यासंदर्भात लागू होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दुचाकी धडकून कुत्र्याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी डिलिव्हरी बॉय विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करत न्यायमूर्तींनी हा निकाल दिला आहे. (HC quashes FIR against Swiggy delivery person)
स्विगीच्या डिलिव्हरी बॉयची बाईक एका भटक्या कुत्र्याला धडकून कुत्रा ठार झाला होता. या प्रकरणात मानस गोडबोले या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निकाल दिला आहे. "प्राणीप्रेमी प्राण्यांना मूल मानतात, पण प्राणी हे मनुष्य नाहीत. कलम २७९, कलम ३३७ हे माणसांशी संबंधित आहेत. ज्यांनी कुत्रा किंवा मांजर पाळलं आहे, ते त्यांना मुलासारखंच सांभाळतात, यात काही शंका नाही. पण मूलभूत जीवशास्त्र असे सांगते की ते मनुष्य नाहीत. कलम २७९ आणि कलम ३३७ माणसाच्या जीवाला धोका निर्माण करण्याशी संबंधित आहेत, त्यामुळे या घटनेत गुन्हा मान्य होण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत, त्याच या खटल्यात नाहीत. " असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
या प्रकरणात न्यायमूर्तींनी राज्य सरकराने याचिककर्त्याला २० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारातून वसुल करायची आहे.
याचिकाकर्त्याचे वय घटनेवेळी १८ वर्षं होते. तो जेवणाचे पार्सल देण्यासाठी दुचाकीवरून चालला होता. या वेळी मरीन ड्राईव्ह परिसरात तक्रारदार व्यक्ती कुत्र्यांना खाऊ घालत होती. यातील कुत्रा या दुचाकीच्या आडवा आला आणि अपघात झाला. यात कुत्रा मारला गेला.
पोलिसांनी कलम २९७, ३३७, ४२९ तसेच मोटर व्हेईलक अॅक्टमधील १८४ नुसार गुन्हा नोंद केला होता.
न्यायमूर्तींनी पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. "जी कलमं लावली आहेत, त्यात कोणताच तर्क दिसत नाही. पोलिसांनी विवेकबुद्दीचा वापर करायला हवा होता, ते कायद्याचे रक्षक आहेत," असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
हेही वाचा