Rohit Pawar Tweet : ‘चुनचून के’ मारण्याची धमकी देणारे गेले कुठे? रोहीत पवारांचे खोचक ट्विट | पुढारी

Rohit Pawar Tweet : 'चुनचून के' मारण्याची धमकी देणारे गेले कुठे? रोहीत पवारांचे खोचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क :महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार करणारे, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे, ‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं?” असं खोचक ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar Tweet) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध वादग्रस्त विधानांवरुन वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलेल्या सीमाप्रश्नाचवरील वक्तव्य चर्चेत आहे. त्यावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली.महाराष्ट्राच्या नेत्यांनी कर्नाटकात येवू  नये असं वक्तव्यही त्यांनी केले.  महाराष्ट्राचे सीमाभाग समन्‍वयक मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि इतर मंत्र्यांनाही कर्नाटकमध्ये येवू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविलं. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुनावणी आणि सीमाभागासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई  ३ डिसेंबरला बेळगावला जाणार होते. मात्र, या दोन्ही मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असं ट्विट करत सांगितलं. ६ डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने येथील आंबेडकरवादी संघटनांनी काही कार्यक्रमांना येण्याचा आग्रह केला आहे. या कारणाने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.

Rohit Pawar Tweet : इतकी लाचारी का आणि कोणासाठी?

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी आज (दि.५) ट्विट करत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही.”

“सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो. दुसरीकडं महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार करणारे, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे, ‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो”,असेही त्‍यांनी आणखी ट्विट करत म्हटलं आहे,

हेही वाचा 

Back to top button