

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत, अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकारने तातडीने पुढाकार घ्यायला हवा होता पण सरकार कुठे आहे? असा सवाल अजित पवार यांनी आज (दि.१८) पत्रकार परिषदेत केला आहे. खरीप आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने गेल्या काही दिवसांपासून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे पण सरकारचे याकडे काहीच लक्ष नाहीय असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अनके भागातील धरणे भरली असल्याने पूर येऊ लागले आहेत. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. अशा सूचना करताना पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या उत्तर व दक्षिण भागावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि दिवाळीच्या तोंडावर अशी नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असल्याने सरकारने संबधीत भागातील लोकांना अलर्ट केलं पाहिजे.
नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावेळी अनेक शेजाऱ्यांनी त्यांना काहीही मदत मिळत नसल्याची तक्रार केली आहे या धर्तीवर आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असल्याचे पवार यांनी सांगितले. पुण्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यांची आणि वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे यासाठी शासनाने तात्काळ मदती पाठवाव्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांमध्ये दिवाळी ही योजना सरकारने घोषित केली होती. त्यासाठी ५१३ कोटींचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे, पण दिवाळी तोंडावर आली आहे त्याची अजून अंमलबजावणी झाली नसल्याने हाही मुद्दा चर्चेला घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हे वाचलंत का?