पुणे : विजेत्यांची पारितोषिकाची रक्कम वाढवावी : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार | पुढारी

पुणे : विजेत्यांची पारितोषिकाची रक्कम वाढवावी : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 140 पदके जिंकून एका नवा इतिहास घडवला आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी ऐतिहासिक आहे. या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करणार आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे (एमओए) अध्यक्ष अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यालयात चषक प्रदान सोहळा तसेच सभागृहाचे नामकरण खाशाबा जाधव यांच्या नावाने करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमओएचे सचिव नामदेव शिरगावकर, वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, प्रदीप तळवळकर, खनिजदार अ‍ॅड. धनंजय जाधव, उपपथक प्रमुख अमित गायकवाड, नीलेश जगताप, सुंदर अय्यर, अ‍ॅड. अभय छाजेड यांसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुण्यातील पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला.

पवार म्हणाले, ‘विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, तालुका क्रीडा संकुलांसाठी भरीव निधी दिलेला आहे. तसेच डीपीडीसीतूनदेखील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी निधीची तरतूद आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या माध्यमातून आपल्या भागात क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विभागीय क्रीडा संकुलाचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्त असतात. त्यांनी देखील खेळाला चालना देण्यासाठी रस दाखवला पाहिजे.’

शिरगावकर म्हणाले, ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राचे यश हे खरोखरच मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना अतिशय भावले आहे. स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जिंकलेला चषक आगामी काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरवण्यात येणार आहे. याचा खेळांना चालना देण्यासाठी फायदा होणार आहे.’ यावेळी अमित गायकवाड, नीलेश जगताप आणि खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. धनंजय भोसले यांनी आभार मानले.

कामगिरीच्या आढावा समितीची नियुक्ती
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झालेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये 14 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आणि एमओएचे सचिव नामदेव शिरगावकर हे पदसिद्ध असून त्यामध्ये प्रदीप गंधे, अशोक पंडित, मनोज पिंगळे, काका पवार, शांताराम जाधव, प्रमोद चांदुरकर, स्मिता यादव, नीता तळवळकर, विशेष निमंत्रित म्हणून धनराज पिल्ले व आदिल सुमारीवाला यांच्यासह दोन शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असेल. ही समिती लवकरच अहवाल तयार करून तो शासनाला सादर करणार आहे.

गुजरातच्या धर्तीवर मिनी ऑलिम्पिक
राज्य पातळीवर मिनी ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. नुकत्याच गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोयी-सुविधा आणि इतर बाबींचा विचार करता त्याच धर्तीवर राज्यपातळीवर मिनी ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जातील. त्यामध्ये क्रीडा विभागाचेही सहकार्य असणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आत्मपरीक्षणाची गरज
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मलखांब, स्केटिंग, योग आदी खेळांचा नव्याने समावेश झाला होता. त्यातील पदकांमुळे आपण अव्वल क्रमांकावर पोहोचलो. परंतु कुस्ती, कबड्डी, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण या स्पर्धांमध्ये आपण कमी पडलो असून, हे अपयश आपल्याला मान्य करावे लागेल. या सर्व खेळांबाबत आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Back to top button