उत्तर प्रदेशाचे हित डोळ्यापुढे ठेवून केंद्राकडून साखर निर्यात कोटा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप | पुढारी

उत्तर प्रदेशाचे हित डोळ्यापुढे ठेवून केंद्राकडून साखर निर्यात कोटा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

बारामती/सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर प्रदेशाचे हित डोळ्यापुढे ठेवून केद्र सरकार साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना ठरवून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. केंद्राच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात टनाला शे-दोनशे रुपयांचा फटका बसत असल्याचे ते म्हणाले. सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार दत्तात्रय भऱणे, आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे, शहाजीराव काकडे, संदीप जगताप, सुदाम इंगळे आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, महाराष्ट्राने गतवर्षी उत्तर प्रदेशाला साखर उत्पादनात मागे टाकले. पण त्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून साखर निर्यात कोटा ठरवला जात आहे. त्यात आपल्या राज्याचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अतुल सावे यांनी यासंबंधी दिल्लीत अमित शहा, पियुष गोयल यांच्याशी बोलावे, असे मी त्यांना सुचवले आहे. मागच्याप्रमाणे साखर निर्यात कोटा ठेवण्यासाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. उत्तर प्रदेशाला बंदर जवळ नाही. त्यामुळे ते निर्यात न करता कोटा विकतात. सध्या कोलकाता मार्केट त्यांनी काबिज केले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ व निर्यातीवरच राज्यातील कारखान्यांना अवलंबून राहावे लागत आहे. निर्यात कोट्याची बंधने केंद्राने लादू नयेत. एकेकाळी जगात साखरेच्या बाबतीत ब्राझिलची मक्तेदारी होती. भारताने ती मोडली. राज्याचा निर्यातीचा वाटा मोठा आहे. पण बदलत्या काळात इथेनाॅल उत्पादन अधिकचे वाढवावे लागेल.

सोमेश्वरनेही एक लाख लिटरपेक्षा अधिक क्षमतेची डिस्टलरी सुरु करावी. त्यासाठी सभासदांची विशेष सभा बोलावली तर निमंत्रित म्हणून मी तेथे येवून बोलेन. इथेनाॅल प्रकल्पांसाठी कारखान्यांना फक्त ५ टक्के हिस्सा उचलावा लागत आहे. ९५ टक्के रक्कम बॅंकेकडून मिळते आहे. इथेनाॅलचा विचार केला तर ही रक्कम फिटून जाते. शिवाय प्रकल्प कारखान्याच्या मालकीचे होतात, असे पवार म्हणाले. सोमेश्वरची गाळप क्षमता आता ८५०० टन प्रति दिन इतकी होणार असल्याने ३६ मेगावॅटपर्यंत सहवीज निर्मिती प्रकल्पाची विस्तारवाढ गरजेची असल्याचे ते म्हणाले.

उस्मानाबादमधील बानगंगा व बिराजदार हे कारखाने नातेवाईकांनी चालवायला घेतले आहेत. तेथे १८०० ते २२०० रुपये दर दिला तर आमचा सत्कार केला गेला. इथे ३ हजारांपेक्षा अधिक दर देवूनही टाळ्या वाजत नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. सहकारात राजकारण आणणे चुकीचे आहे. भीमा कारखाना सुरु करण्यासाठी राजकारण न आणता ३८ कोटींची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भोरच्या राजगडला तशीच मदत करण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी विकासकामांचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.

नोंदीनुसारच ऊस गाळपाला आणा

कोल्हापूरच्या दौऱयाचा संदर्भ देत पवार म्हणाले, तेथील दत्त आसुर्ले कारखान्याची रिकव्हरी १४.५० इतकी आहे. भाव जवळपास सोमेश्वरएवढाच त्यांनी दिला. बारामतीत सोमेश्वरपेक्षा माळेगावची रिकव्हरी थोडीशी अधिक आहे. परंतु माळेगावने गेटकेन व सभासदांना वेगवेगळा दर दिला. सोमेश्वरने एकसारखा दर दिला. रिकव्हरीत सुधारणा होण्यासाठी नोंदीनुसारच ऊस गाळपाला आणावा. त्यात कोणाचीही वशिलेबाजी नको, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. ८६०३२ वाणाची अधिक लागवड अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

सत्ताधा-यांकडून भेदभाव

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आमच्या काळातील कामांना स्थगिती देण्यात आली. त्या विरोधात आम्ही न्यायालयात लढा देत आहोत. परंतु सत्ताधाऱयांकडून असा भेदभाव अपेक्षित नाही. अन्यथा यापुढे तो पायंडा पडत जाईल. आपली ही संस्कृती नाही. सत्ताबदल झाला तर त्यांनाही याची किंमत मोजावी लागेल असा इशारा पवार यांनी दिला. आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे कधी वाटले नाही. नाही तर आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांना मुख्यमंत्री केले असते. पण ते कधी तिकडे निघून गेले, हे कळलेच नाही, या शब्दात त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.

कोणाचे काय झाले यापेक्षा रानात लक्ष द्या
शिंदे गटाचे काय झाले, धनुष्यबाण गोठवल्यावर काय हईल, शिवसेनेचे कसे होणार, असल्या चर्चा करण्यापेक्षा शेतक-यांना रानात अधिक लक्ष द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

पुरंदरला दुसरे युनिट सुरु करा : आमदार संजय जगताप

सोमेश्वरने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक प्रगती करत राज्यात नावलौकीक मिळवला आहे. पुरंदर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे सोमेश्वरचे दुसरे युनिट पुरंदरला सुरु करावे, पुरंदरच्या शेतकऱयांना प्राधान्याने सभासद करून घ्यावे, अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली.

पवारांच्या नेतृत्वात छत्रपती पुढे जाईल : आमदार भरणे

मी छत्रपती कारखान्याचा अध्यक्ष असताना सोमेश्वरसोबत ऊस दराची स्पर्धा होत होती. सध्या छत्रपतीपुढे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात छत्रपती पुन्हा जोमाने उभा राहिल, असा विश्वास आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुक्यातील निरा भीमा, कर्मयोगी कारखाने नावाला सहकारी आहेत. तेथील कारभार खासगी कारखान्याप्रमाणे असल्याची टीका त्यांनी केली. सोमेश्वरच्या प्रगतीचे कौतुक केले.

Back to top button