पुढारी ऑनलाइन डेस्क : मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हे कट्टर शिवसैनिक असून अनेक वादळांमध्ये त्यांनी शिवसेनेची साथ दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेत्यांकडून निष्ठा शिकून घ्यावी, असा टोला राऊत यांनी शिंदे यांना लगावला आहे. तसेच त्यांनी दुसरा पक्ष स्थापन करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे, असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.
सध्या राज्यातील राजकारणात पोरखेळ सुरू असून शिंदे गटाकडून भातुकलीचा खेळ सुरू आहे. तसेच सध्या शिंदे गटाकडून दररोज नवनव्या नियुक्त्या सुरू आहेत. यावर शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करीत आहेत, असा प्रश्नवजा टोला राऊतांनी लगावला आहे. सत्ता कोणाला नको असते, आम्हालाही हवी आहे मात्र, त्यासाठी आम्हाला कोणताही गैरमार्ग वापरायचा नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे, असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. शिंदे हे सध्या शिवसेनेच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. या भेटीचा संदर्भ घेऊन खासदार राऊत यांनी शिंदे यांना 'ज्येष्ठांकडून निष्ठा शिकावी', असा टोला लगावला आहे.
हे ही वाचा