पुणे : मैत्रिणीला फिरवण्यासाठी रात्री करायचे घरफोडी | पुढारी

पुणे : मैत्रिणीला फिरवण्यासाठी रात्री करायचे घरफोडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मैत्रिणीला सोबत फिरवून मौजमजा करण्यासाठी रात्री रेकी करून घरफोडी करणार्‍या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात एका विधीसंघर्षित मुलाचा समावेश आहे. गणेश तिमन्ना साखरे (वय 21, रा. नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे चोरट्याचे नाव आहे. दोघांकडून पोलिसांनी आयफोन कंपनीचे मोबाईल, अ‍ॅपल वॉच, डेल कंपनीचा लॅपटॉप, साउंड बॉक्स, इलेक्ट्रिक वस्तू असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड येथील लिबर्टी सोसायटीतील एका बंगल्यातून एलईडी टीव्हीसह इतर इलेक्ट्रिक वस्तू चोरट्यांनी चोरल्याची तक्रार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

बंगल्यातील व्यक्ती मुंबईला गेले असताना चोरट्यांनी ही चोरी केली; तसेच बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका कंपनीच्या ऑफिसमधूनदेखील चोरट्यांनी एक एलईडी टीव्ही चोरला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना ही चोरी आरोपी साखरे व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. घरफोडी करण्यापूर्वी विधीसंघर्षित बालक परिसराची रेकी करत असे.

कोणत्या ठिकाणी घरफोडी करायची आहे, हे ठरल्यानंतर रात्री ते डल्ला मारत होते. मात्र, पोलिसांच्या नजरेतून त्यांचा हा घरफोडीचा धंदा फार दिवस टिकला नाही. अखेर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, कर्मचारी नामदेव खिलारे, गणेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

आरोपी साखरे याचे चौथीपर्यंत शिक्षण झाले आहे. मैत्रिणीला फिरवण्यासाठी व मौजमजेसाठी तो त्याच्या अल्पवयीन साथीदारासोबत घरफोड्या करत होता. दिवसा रेकी करून दोघे रात्री घरफोड्या करत होते.

                          -विनायक वेताळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क

Back to top button