आता कुठे आहे ‘मंगळाचा निवासी’ असलेला ‘तो’ मुलगा? | पुढारी

आता कुठे आहे ‘मंगळाचा निवासी’ असलेला ‘तो’ मुलगा?

मॉस्को : रशियातील बोरिस किप्रियानोविच या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलाने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्याचे वय 26 वर्षांचे आहे. आपण पूर्वजन्मात मंगळ ग्रहाचा रहिवासी होतो असा दावा त्याने केला होता. सध्या हा मुलगा आणि त्याचे सर्व कुटुंबच गायब आहे. हे कुटुंब रशियन सरकारच्या ताब्यात असल्याचेही म्हटले जाते.

बोरिसचा जन्म 11 जानेवारी 1996 मध्ये रशियाच्या वोल्गोग्राड येथे झाला. त्याचे आई-वडील डॉक्टर होते. आईने एका मुलाखतीत सांगितले होते की बोरिस अतिशय लहान वयाचा होता त्यावेळीच त्याच्यामध्ये काही असामान्य क्षमता असल्याचे जाणवले होते. जन्माला आल्यानंतर दोनच आठवड्यांत त्याने कोणत्याही आधाराशिवाय आपले डोके उचलण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यांनंतर तो चक्‍क बोलूही लागला. दीड वर्षांचा होईपर्यंत त्याने वाचनलेखन आणि पेंटिंग करण्यासही सुरुवात केली. दोन वर्षांचा असताना आई-वडिलांनी त्याला किंडरगार्टनमध्ये पाठवले व तिथेही त्याने ज्या वेगाने लेखन-वाचन व वेगवेगळ्या भाषा शिकण्यास सुरुवात केली ते पाहून सगळेच थक्‍क झाले. त्याची स्मरणशक्‍ती अत्यंत तीक्ष्ण होती. तो सात वर्षांचा होता त्यावेळी आई-वडिलांसमवेत एका कॅम्पमध्ये गेला होता. तिथे शेकोटीजवळ काही लोक बसलेले असताना त्याने अचानक आपल्या पूर्वजन्माविषयी बोलण्यास सुरुवात केली. पूर्वीच्या जन्मी मी मंगळ ग्रहाचा निवासी होतो असे तो सांगू लागला. मंगळावरील संस्कृती अत्यंत उन्‍नत होती. तेथील लोक दोन मीटरपेक्षाही अधिक उंचीचे होते. वयाच्या 35 व्या वर्षानंतर तिथे वय वाढणे थांबत असे. त्यामुळे वृद्धावस्थेच्या कोणत्याही खुणा शरीरावर दिसत नसत.

मंगळवासीयांना केवळ हत्यारांनीच मारले जाऊ शकत होते, एरव्ही त्यांना मृत्यू स्पर्श करीत नसे. हजारो वर्षांपूर्वी मंगळावर झालेल्या एका अणुयुद्धामुळे तेथील संस्कृती नष्ट झाली. त्यामुळे तेथील वातावरणही नष्ट होऊन गेले होते. मंगळवासीयांनी गुरू ग्रहालाच सूर्यासारखा तारा बनवण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण ते यशस्वी झाले नाहीत. मंगळवासीयांनी ज्या चुका केल्या त्या पृथ्वीवासीयांनी करू नयेत हे सांगण्यासाठी मी पृथ्वीवर आलो आहे असा दावा त्याने केला होता. मंगळवासीयांचा प्राचीन काळातील इजिप्शियन संस्कृतीमधील लोकांशी संपर्क होता. त्याचा पुरावा तेथील स्फिंक्समध्ये लपलेला असल्याचेही त्याने म्हटले होते. स्फिंक्सच्या डाव्या कानामागे एक रहस्यमय छेद आहे जो दगडाने बंद केलेला आहे.

पृथ्वीवर आपल्यासारख्या अन्यही काही मंगळवासी मुलांनी पुनर्जन्म घेतला असल्याचेही त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. 2012 मध्ये रशियात महापूर येणार असल्याचे भविष्य त्याने वर्तवले होते आणि 8 जुलै 2012 मध्ये तिथे खरोखरच महापूर आला व 171 लोकांचे प्राण गेले. आता हा मुलगा कुठे आहे याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. अशी अफवा आहे की बोरिस आणि त्याच्या आईला रशियन सरकारी अधिकार्‍यांसमवेत जात असताना पाहण्यात आले होते. एका अफवेनुसार संपूर्ण कुटुंबाला रशियन सरकारच्या निगरानीखाली एका अज्ञात ठिकाणी ठेवलेले आहे. सरकारने त्याला इतरांशी संपर्क साधण्यास व बातचित करण्यास मनाई केली आहे. काहींच्या मते, तो आता पूर्वजन्माबाबत विसरून गेला असल्याने मीडियाला टाळत आहे.

Back to top button