मुंबई ; पुढारी वृत्तसेवा – मुंबईत स्वाईन फ्लू ( Swine Flu / H1N1) या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. सध्या मुंबईत स्वाईन फ्लू झालेल्यांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ११ जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे. स्वाईन फ्लू हा श्वसन संस्थेशी संबंधित आजार आहे. काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूला जागतिक महामारी घोषित करण्यात आले. पण लवकरच हा आजार एंडेमिक बनला. तर कोरोना हाही श्वसन संस्थेशी संबंधित आजार आहे.
वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये ५०पेक्षा कमी वय असलेल्या दोन रुग्णांवर Extracoporeal Membrane Oxygenationच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. हे रुग्ण गंभीररीत्या आजारी आहेत. रुग्णालयात सध्या ५ रुग्ण स्वाईन फ्लूचे आहेत.
ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. "फ्लूची लक्षणं असलेले निम्मे रुग्ण स्वाईन फ्लू पॉजिटिव्ह येत आहेत. सध्या स्वाईन फ्लूची स्पर्धा कोरोनाशी सुरू आहे, असे म्हणता येईल," अशी माहिती श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई यांनी टाइम्स ऑफ इंडियाला बोलताना दिली आहे.
एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. राजेश शर्मा यांनी गेल्या ३ आठवड्यापासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असल्याचे म्हटले आहे. "जास्त ताप आणि घसा, नाक या भागांत संसर्ग अशी सुरुवातीची लक्षणं आहेत," असे ते म्हणाले. स्वाईन फ्लूचे वेळेत निदान होणे आवश्यक आहे, स्वाईन फ्लूवर चांगली औषधं उपलब्ध असल्याने त्यावर उपचार करता येतात, असे ते म्हणाले. पण उपचार वेळ झाला तर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे एका मुलीचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या तीन वर्षांत मुंबईत स्वाईन फ्लूमुळे मृत्यूची नोंद नाही. स्वाईन फ्लूची काही लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, अंगदुखी, घसा आणि नाक यात संसर्ग अशी आहेत.