लक्षात असू द्या; जशास तसे उत्तर दिले जाईल : सदाभाऊ खोत | पुढारी

लक्षात असू द्या; जशास तसे उत्तर दिले जाईल : सदाभाऊ खोत

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात असू द्या; जशाच तसे उत्तर दिले जाईल. असे सूचक ट्विट करत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. आज सदाभाऊ खोत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात असू द्या जशास तसे उत्तर दिले जाईल. आता प्रस्थापितांविरुद्धची लढाई अजून तीव्र होणार. यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाचा चावा घेतो. मात्र, वाघाला दगड मारला तर तो नरडीचा खोट घेतो हे लक्षात असू द्या.. “प्राण गेले तरी चालेल मात्र तुमचा मस्तवाल वाडा पडल्याशिवाय राहणार नाही.”

काय आहे नेमके प्रकरण

गुरुवारी (दि. १६ जून) रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी आमदार सदाभाऊ खोत व त्यांचा ताफा पंचायत राज बैठकीच्या निमित्ताने  सांगोला (जि. सोलापूर) गेले असताना पंचायत समितीच्या परिसरात अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने त्यांना अडवून हॉटेलमधील उधारीची मागणी केली. तेथील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला होता. त्यासंबंधी त्यांनी शुक्रवार (दि.१८) सकाळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी म्हटले होते की, या प्रकरणामागे टोमॅटोसारखा गाल लाल असलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात आहे. आरोप करणारा हॉटेल मालक हा गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हे आहेत. त्याला जेवढे सांगितले तेवढेच बोलला. आणि हा व्हिडीओ जाणीवपूर्वक तयार केला गेला आहे आणि पद्धतशीर व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

 

पहा व्हिडीओ : ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून धरत जाब विचारला.

Back to top button