गोपाळ गांधी विरोधकांचे राष्ट्रपतिपदाचे संयुक्त उमेदवार? | पुढारी

गोपाळ गांधी विरोधकांचे राष्ट्रपतिपदाचे संयुक्त उमेदवार?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीस नकार दिल्यानंतर आता विरोधकांचे संयुक्त उमेदवार म्हणून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, महात्मा गांधींचे नातू तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ गांधी ही दोन नावे समोर आली आहेत. यापैकी गोपाळ गांधी यांच्या नावावर सर्वसंमती झाल्याचे समजते.

राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार देण्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने बुधवारी बैठक झाली. शरद पवार स्वत:ही बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर, आम्ही उमेदवाराची चाचपणी करत आहोत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बैठकीला काँग्रेस, शिवसेनेसह 16 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम आदमी पक्षाने निमंत्रण असूनही बैठकीला हजेरी लावली नाही, तर एमआयएमला निमंत्रण नसल्याने असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआयएमएल, आरएसपी, राजद, सप, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जद (एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि झामुमो या पक्षांचे नेते बैठकीला हजर होते.

बैठकीसाठी ममता बॅनर्जी आणि शरद पवार मंगळवारी सायंकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. माकपचे सीताराम येचुरी यांनी आधी बैठकीला हजर राहणार नसल्याचे सांगितले होते. शरद पवार विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर बुधवारी येचुरी स्वत: बैठकीला हजर झाले. ममता बॅनर्जी यांनी 8 मुख्यमंत्र्यांसह 22 नेत्यांना पत्र लिहून बैठकीचे निमंत्रण दिले होते. काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. खर्गे यांचेही नाव संयुक्त उमेदवार म्हणून समोर आले होते.

पवार यांचे नाव समोर आल्यानंतर डाव्या पक्षांनी नवोदित उमेदवाराचा आग्रह धरला होता. पवारांनीही त्यावर डाव्यांना विरोध केला नाही. फारूख अब्दुल्ला यांचेही नाव ममतांनी सुचविलेले असले, तरी गोपाळ गांधी यांना डाव्यांची पसंती आहे. गोपाळ गांधींना उमेदवारीबाबत रीतसर विचारणाही झाली आहे. त्यांच्या नावावर सर्वसंमती झाल्याचेही सांगण्यात येते.
बीजेडीचा भाजपला पाठिंबा!

मतांचे गणित पाहिले तर बीजेडी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस खरे किंगमेकर ठरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या तीन पक्षांपैकी बीजेडीने (बिजू जनता दल) या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. बुधवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तसे जाहीरही केले आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी नकार दिलेला असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आसनावर बसण्यासाठी आग्रह धरला. डावीकडे बैठकीच्या संयोजक व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती दिसत आहेत. बुधवारी यासंदर्भात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निराशा आणि उदासी विरोधी नेत्यांच्या चेहर्‍यावर ठळकपणे दिसून आली.

Back to top button