मेहुणीने लग्‍नाचा तगादा लावत घरे पेटवले, त्‍याने कोयत्‍याने वार करत तिलाच संपवले! | पुढारी

मेहुणीने लग्‍नाचा तगादा लावत घरे पेटवले, त्‍याने कोयत्‍याने वार करत तिलाच संपवले!

इगतपुरी, पुढारी वृत्तसेवा :
अनैतिक संबंधाचा शेवट हा जीवन उद्‍ध्‍वस्‍त करणारच ठरतो, हे अनेक प्रकरणांमधून सिद्‍ध झाले आहे. तरीही क्षणिक मोहामुळे काही जण याचा बळी पडतात, अशी घटना नाशिक जिल्‍ह्यातील इगतपुरी तालुक्‍यातील अधरवड येथे घडकीस आली आहे. विशेष म्‍हणजे जमावाने तीन घरांना आग लावत माझ्‍या मेहुणीचा खून केला, अशी फिर्याद देणाराच याप्रकरणातील आरोपी निघाला आहे.पोलिसांच्‍या चाणाक्षपणामुळे आरोपी गजाआड झाला असला तरी त्‍याच्‍या कृत्‍याने तीन कुटुंब उद्‍ध्‍वस्‍त झाली आहेत.

लग्‍नाचे आमिष दाखवत मेहुणीशी जुळवले सूत

या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधरवड येथील तारीचा मोडा येथील कातकरी वस्तीत शरद महादु वाघ आपल्‍या कुटुंबासह राहत होता. लग्‍नाचे आमिष दाखवत त्‍याने मेहुणी लक्ष्मीबाई  पवार हिच्‍याशीच सूत जुळवले. मात्र काही दिवसांनंतर तो तिला टाळू लागला.

आताच लग्‍न कर म्‍हणत मेहुणीने दिले घर पेटवून

मागील काही दिवस लक्ष्मीबाई पवार हिने शरद वाघच्‍या मागे लग्नाचा तगादा लावला होता. शुक्रवारी पहाटे ( दि. १० ) पुन्हा एकदा लक्ष्मीबाईने लग्नाचा तगादा लावत शरदबरोबर वाद घातला. आत्ताच लग्न कर नाही तर तुझे घर पेटवून देईन, अशी धमकीही तिने दिली. या दोघांचा वाद विकोपाला गेला. रागाच्‍या भरात लक्ष्मीबाईने शरद वाघ याचे घरच पेटवून दिले. घर पेटवल्याने संतप्‍त झालेल्‍या शरदने घरातल्या कोयत्याने मेहुणीच्‍या गळ्यावर वार केला. तिचा जागीच मृत्‍यू झाला.

जमावाने खून केल्‍याचा बनाव करत ३ कुटुंबाची घरे जाळली

मेहुणीचा खून केल्‍यानंतर घाबरलेल्‍या शरद वाघने पोलिसांना चकवा देण्‍यासाठी नवा प्‍लॅन केला. त्‍याने थेट तीन कातकरी कुटुंबाची घरेच पेटवून दिली. ही घरे आगीत भस्‍मसात झाली. माझ्‍यावर १० ते २० जणांच्या टोळक्यांनी प्राणघातक हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी माझी मेहुणी मला सोडविण्‍यासाठी आली. जमावातील एकाने केलेला वर्मी घाव तिला बसल्‍याने तिचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची फिर्याद त्‍याने दिली.

पोलिसांचा संशय खरा ठरला, तीन कुटुंबे उद्‍ध्‍वस्‍त करणारा आरोपी गजाआड

शरद वाघने मेहुणीचा खून करत शेजारील तीन घरे पेटवून दिली. एखाद्‍या चित्रपटाला साजेसे कथानक त्‍याने रचले.
सारं काही अज्ञात जमावाने केले, असा बनाव रचत त्‍याने पोलिसांना हुल देण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांना त्‍याच्‍या हालचाली संशयास्‍पद वाटल्‍या. तसेच त्‍याच्‍या बोलण्‍यातही सुसंगती नव्‍हती. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच शंकर वाघ त्‍याने आपला गुन्हा कबुल केला. आपण गुन्‍हा लपविण्‍यासाठी तीन घरांना जाळल्‍याचे त्‍याने सांगितले. तसेच मेहुणीबरोबर असणार्‍या अनैतिक संबंधातूनच हा प्रकार घडल्‍याचे त्‍याने पोलिसांना सांगितले.

लक्ष्मीबाई पवार खून प्रकरणी शरद वाघची पत्‍नी सविता शरद वाघ (वय २७, रा. अधरवड) हिने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी शरद वाघ याला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले,  शिवाजी जुदंरे आदी करीत आहेत.

Back to top button