गुणवंत हरपले! बारावीत यंदा एकालाही 100 टक्के नाहीत | पुढारी

गुणवंत हरपले! बारावीत यंदा एकालाही 100 टक्के नाहीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोना प्रादुर्भावाचा जबरदस्त फटका शिक्षण क्षेत्राला बसला असल्याचे बारावीच्या निकालात दिसून आले आहे. राज्यात एकाही विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविता आले नाहीत, तर 90 टक्क्यांहून अधिक गुण केवळ 10 हजार 47 विद्यार्थ्यांनाच मिळाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी निकालात गुणवंतांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी बारावीचा निकाल जाहीर केला. या वेळी प्रभारी सचिव माणिक बांगर यांच्यासह मंडळातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. नऊ विभागीय मंडळांमध्ये परीक्षेसाठी 14 लाख 49 हजार 664 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यातील 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 83 हजार 156 विद्यार्थी नापास झाले. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी 95.35 टक्के आहे, तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 टक्के आहे. त्यामुळे मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 2.06 टक्क्याने अधिक आहे.

विधान परिषदेसाठी कंबर कसावी लागेल : ना. छगन भुजबळ

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, तर त्या खालोखाल नागपूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागाने बाजी मारली आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. यंदा परीक्षा होणार की नाही, याबाबत शंका होती. त्यानंतर परीक्षा ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली; परंतु राज्य मंडळाने कोणत्याही दबावाला बळी न पडता 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान बारावीची लेखी परीक्षा घेतली.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर परीक्षेचे नियोजन करून परीक्षा केंद्रे वाढवली आणि परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेनंतर साधारण दोन महिन्यांमध्ये बारावीचा निकाल जाहीर केला. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण, तर प्रादुर्भाव कमी झाला की ऑफलाईन शिक्षण अशा कात्रीत विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परंतु चांगले गुण मिळवण्यात मात्र विद्यार्थ्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा विज्ञान शाखेतील 6 लाख 24 हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 6 लाख 22 हजार 749 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 12 हजार 208 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचे सर्वाधिक 98.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील 4 लाख 20 हजार 393 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या 4 लाख 15 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 75 हजार 749 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 90.51 टक्के आहे.

विधान परिषद निवडणूक : रामराजे नाईक- निंबाळकर, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

वाणिज्य शाखेतून नोंदणी केलेल्या 3 लाख 55 हजार 624 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 53 हजार 957 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 3 लाख 24 हजार 629 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 91.71 टक्के आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 47 हजार 822 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 46 हजार 973 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 43 हजार 405 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 92.40 टक्के आहे, तर आयटीआयच्या नोंदणी केलेल्या 927 विद्यार्थ्यांपैकी 923 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
त्यापैकी 613 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 66.41 असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली असली, तरी गुणवंतांचा टक्का मात्र घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाहा आकडे काय सांगतात…

– नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – 14 लाख 49 हजार 664
– प्रविष्ट झालेले विद्यार्थी – 14 लाख 39 हजार 731
– उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – 13 लाख 56 हजार 604
– नापास झालेले विद्यार्थी – 83 हजार 156
– उत्तीर्ण मुलांचा निकाल – 93.29 टक्के
– उत्तीर्ण मुलींचा निकाल – 95.35 टक्के
– प्रविष्ट झालेले पुनर्परीक्षार्थी – 35 हजार 527
– उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – 18 हजार 755 (53.02 टक्के )
– खासगीरीत्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी – 33 हजार 795
– उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – 29106
– क्रीडा गुणांचा लाभ मिळालेले विद्यार्थी – 3 हजार 299
– प्रतिरोधित करण्यात आलेले विद्यार्थी – 11
– तृतीयपंथी विद्यार्थ्यांची बारावीसाठी नोंदणी – 40
– दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 95.24 टक्के
– 24 विषयांचा निकाल 100 टक्के
– शून्य टक्के निकालाची महाविद्यालये – 21
– निकाल राखून ठेवलेले – 158
– 100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी – एकही नाही
– 90 टक्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – 10 हजार 47
– विशेष प्रावीण्यासह 75 टक्यांहून अधिक गुण – 2 लाख 30 हजार 769
– प्रथम श्रेणीसह 60 टक्यांहून अधिक गुण – 5 लाख 58 हजार 678

‘खेलो इंडिया’ मध्ये ‘ध्रुव’ला 11 सुवर्ण, योगासन खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

कसा घसरला गुणवंतांचा टक्का

2020 साली 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते, तर 2021 साली तब्बल 957 विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले होते. यंदा मात्र एकाही विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळवता आलेले नाहीत. गेली दोन वर्षे 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. 2020 साली 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्यांहून अधिक गुण मिळाले, तर 2021 साली 1 लाख 4 हजार 633 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. यंदा केवळ 10 हजार 47 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तशीच परिस्थिती 60 आणि 75 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे यंदा गुणवंतांचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे – 93.61 टक्के, नागपूर – 96.52 टक्के, औरंगाबाद – 91.57 टक्के,
मुंबई – 90.91 टक्के, कोल्हापूर – 95.07 टक्के, अमरावती – 96.34 टक्के, नाशिक – 95.03 टक्के, लातूर – 95.25 टक्के, कोकण – 97.21 टक्के, एकूण निकाल – 94.22 टक्के

मंडळापुढे बारावीच्या परीक्षेच्या आयोजनाचे आव्हान होते. मात्र, सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे विनाअडचण परीक्षा सुरळीत झाली. विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून दिल्याचा, 25 टक्के अभ्यासक्रम कमी झाल्याचा लाभ झाला. त्यामुळे 2020 च्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे.

                          – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

Back to top button