शेतात खत नेण्याची शेतकर्‍यांची लगबग | पुढारी

शेतात खत नेण्याची शेतकर्‍यांची लगबग

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाअभावी शेतीची कामे रखडली आहेत. पावसाने वेळीच हजेरी लावली नाही, तर शेतकर्‍यांचे वर्षाचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. असे असले, तरी शेतकऱ्यांची शेतात खत नेण्याची लगबग वाढली आहे.

रोहिणी नक्षत्र सुरू झाले, पण ते कोरडे गेले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता बुधवारपासून (दि. 8) सुरू होणार्‍या मृग नक्षत्राकडे लागल्या आहेत. आंबेगाव व शिरूर तालुक्यात खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरिपात भुईमूग, बाजरी, मूग, कांदा, बटाटा तसेच पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात.

सध्या पावसाचे वातावरण तयार होते. पण, पाऊस हजेरी लावत नाही. खरिपात योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांची चांगली वाढ होते व नंतरच्या हंगामातील सर्व कामे योग्य वेळेतच होतात. सध्यातरी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी शेतीची पूर्वतयारी केली असून, जर पावसाने योग्य वेळी हजेरी लावली नाही, तर शेतकर्‍यांचे वर्षाचे गणित कोलमडल्याशिवाय राहणार नाही.

योग्यवेळी पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होऊन अनेक संकटे उभी राहतील. पावसाने योग्यवेळी हजेरी लावल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सध्यातरी शेतकरी शेतीच्या पूर्वतयारीसाठी दुचाकी वाहनाला छोटी गाडी लावून आपल्या शेतात खत नेऊन टाकण्याचे काम करताना दिसत आहेत.

सध्या ट्रॅक्टरच्या साह्याने उकिरड्यातील खत शेतात नेऊन टाकणे परवडत नाही. त्यामुळे दुचाकी वाहनाला हा छोटा गाडा लावून शेणखत शेतात टाकले जाते. सध्या आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाने हजेरी लावणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
– बंडू आदक, शेतकरी, मांदळेवाडी

Back to top button